मंगळवार, १ डिसेंबर, २०२०

एड्स: एक जीवघेणा आजार - विशेष लेख


१ डिसेंबर हा जागतिक एड्स दिन आहे, त्यानिमित्ताने विशेष लेख 👇


एड्स: एक जीवघेणा आजार - विशेष लेख

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       १९६० च्या दशकात आफ्रिकेत चिपांझीत एचआयव्ही एक आणि माकडात एचआयव्ही दोन विषाणू प्रथम आढळला आणि कांही दशकातच या महाभयंकर आजाराने सर्व जगालाच ग्रासून टाकले. लैंगिक शिक्षणाचा अभाव, चुकीची माहिती आणि गैरसमज यामुळेच एड्स वेगाने फोफावला असून केवळ जनसंपर्क, योग्य ते मार्गदर्शन, जागरूकता यातूनच एड्सवर नियंत्रण शक्य आहे. एड्सवर अजूनही प्रभावी औषध, लस निर्माण झाली नाही. त्यामुळे प्रामुख्याने विकसनशील देशापुढे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे एड्सची लागण झालेल्यांंमध्ये तरूणांची संख्या सर्वाधिक आहे. एका अनुमानानुसार भारतात दरवर्षी १९ ते २५ या वयोगटातील सुमारे तीन लाख तरुणांना एचआयव्ही ची लागण होत आहे आणि एका पिढीतून दुसऱ्या पिढीत याचे झपाट्याने संक्रमण होत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारी नुसार जगात २५ लाख लहान बालकांना जन्म घेतानाच या असाध्य रोगाचे शिकार व्हावे लागले आहे.


       अभ्यासकांनी व्यक्त केलेल्या मतानुसार भारतासारख्या विकसनशील देशात अज्ञान, दारिद्र्य, अशिक्षितपणा, अस्वच्छता या समस्येमुळे एचआयव्हीचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. हा रोग केवळ शहरापुरताच मर्यादित राहिलेला नसून खेड्यापाड्यापर्यंत सुद्धा पोहोचला आहे. तो केवळ धोकादायक वर्तणूक असलेल्या लोकांचाच प्रश्न राहिलेला नसून कितीतरी सुशिक्षित समुदायातील लोकांमध्ये पण एचआयव्ही चा संसर्ग झाल्याचे आढळून येत आहे. एड्स ही संपूर्ण जगाला भेडसावणारी केवळ आरोग्यविषयक समस्या नसून सामाजिक, आर्थिक व मानसिक समस्या बनली आहे. ज्या वेगाने एचआयव्ही चा प्रसार होतो, त्यामानाने प्रचार कमी पडत आहे. शासकीय स्तरावर एड्स प्रतिबंधासाठी चालू असलेल्या प्रयत्नांना जनतेचा पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाही. या रोगाविषयी लोकांची मानसिकता व वैचारिक स्तर अभ्यासला असता सुशिक्षित लोक हे प्रतिष्ठेच्या चुकीच्या कल्पनेमुळे तर अशिक्षित लोक हे अज्ञानामुळे या रोगाच्या गांभीर्यापासून दूर रहात असल्याचे चित्र दिसत आहे. एड्स विषयी समाजाने स्विकारलेली भूमिका ही अर्धवट ज्ञानावर आधारित असल्याने व याविषयी मोकळेपणाने बोलण्याची तयारी नसल्याने एड्स समस्या कठीण बनली आहे.


       जगभरातील संशोधनातून स्पष्ट झाले आहे की, इतर कोणत्याही रोगापेक्षा कित्येक पट जास्त सामाजिक धिक्कार एड्स च्या रूग्णांच्या वाट्याला येतो. हा रोग केवळ लैंगिक संबधातून पसरत नसून इंजेक्शनद्वारे, ब्लडद्वारेही होऊ शकतो. हे लोकांच्या लक्षात येत नाही. लक्षात येते ते कारण म्हणजे चुकीच्या लैंगिक वर्तणुकीचे. त्यामुळे इतर रोगांपेक्षा जास्त नैराश्य, वैफल्य, घृणा, द्वेष, चिंता, ताण एड्समुळे निर्माण होतो. विशेष म्हणजे रूग्णांंबरोबर इतरांनाही अवहेलनेला सामोरे जावे लागते. एड्सपीडित कुटुंबाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोनच बदलतो. प्रत्येक घरातून अशा व्यक्तीला अस्पृश्यतेची वागणूक मिळते. एड्सने मरण पावलेल्या तरूण व्यक्तीच्या पश्चात कुटुंबाची अवस्था दयनीय होते. वृद्ध आईवडील केवळ दैवावर भरवसा ठेवून आलेला दिवस पुढे ढकलतात. एड्स पीडितांच्या विधवांना उर्वरित आयुष्य कसे जगायचे याचा मार्गच सापडत नाही. या दांपत्याच्या पोटी जन्म घेणाऱ्या बालकांना जन्म घेतानाच असाध्य अशा या रोगाला बळी पडावे लागते. मुले लहान असतानाच त्यांचे आईवडील दगावतात. या अनाथ मुलांना बालसुधारगृहातही थारा मिळत नाही. इतर नातेवाईक ढुंकूनही पहात नाहीत. संपूर्ण मानवजातीलाच मान खाली लावणारी ही गोष्ट आहे.


       एड्सची साथ ही मानवी वर्तनाशी निगडीत आहे म्हणूनच साथ आटोक्यात आणणेही सर्वस्वी माणसाच्या इच्छाशक्तीवर व प्रयत्नांवर अवलंबून आहे. लैंगिक संबंध सुरक्षित कसे राहतील यावर लक्ष केंद्रित केले तर ते जास्त यशस्वी ठरेल, असे अनेक तज्ञांचे मत आहे. या रोगाकडे शरीर वैज्ञानिक दृष्टीकोनातून बघायला हवे. तरूण वर्ग हा देशाचा आधारस्तंभ मानला जातो. त्यांना  या रोगांपासून अगोदरच सावध करणे महत्त्वाचे आहे. त्यांच्याकरीता संस्कार शिबीरे आयोजित करायला हवीत. या शिबीरांच्या माध्यमातून लैंगिक शिक्षण व एड्स या दोहोंचीही माहिती देण्यात यावी. एड्सवर औषध जरी नसले तरी समाजाने, कुटुंबाने अशा रूग्णांना मानसिक आधार देण्याची गरज आहे. केवळ मायेचा आधारच अशा रुग्णांना जगण्याची उभारी देवू शकतो आणि यातूनच कुटुंब व्यवस्थेला बसलेल्या धक्क्यातून थोड्याफार प्रमाणात मार्ग निघण्यास मदत होणार आहे. तेंव्हा प्रत्येकाने एड्स विरुध्दचा लढा हे आपले आद्य कर्तव्य समजून त्याला सर्वाधिक प्राधान्य द्यावे. प्रसारमाध्यमांनी यासाठी दररोज खास वेळ जनजागरणांसाठी राखून ठेवावा. एड्स बाबतच्या स्थानिक व जागतिक बातम्यांना ठळक स्वरूपात स्थान द्यावे. असे प्रयत्न झाले तरच एड्स निर्मूलन शक्य आहे.