ईद-ए-मिलाद (हजरत मुहम्मद पैगंबर स. अ. यांची जयंती)
मुहम्मद पैगंबर यांंचे जीवनचरित्र व शिकवण
लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी
हजरत मुहम्मद पैगंबर यांंचा जन्म मक्का येथे २२ एप्रिल इ. स. ५७० मध्ये झाला. इस्लामी पंचागानुसार १२ रबिलावल या दिवशी जन्म झाला. हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस 'ईद-ए-मिलाद' म्हणून साजरा केला जातो. कुरैश कबिल्याचे सरदार अब्दुल मुत्तलिब यांचे सुपुत्र अब्दुल्लाह हे मुहम्मद यांचे पिता. मुहम्मद पैगंबर यांचा जन्म होण्याच्या काही दिवसापूर्वीच त्यांंच्या पित्याचे निधन झाले. ते जेमतेम सहा वर्षाचे असतानाच त्यांची आई अमिना यांचेही निधन झाले. आठ वर्षाचे असताना आजोबा अब्दुल मुत्तलिब यांंचेसुध्दा निधन झाले. तेंव्हा मुहम्मद यांच्या संगोपनाची सर्वस्वी जबाबदारी त्यांचे काका अबू तालिब यांच्यावर आली. अबू तालिब यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने मुहम्मद आपल्या काकांंच्या मेंढ्या सांभाळण्याचे काम करायचे. पुढे काकांबरोबर व्यापार करण्यासाठी लांब प्रवासास गेल्याने त्यांना व्यावहारिक माहिती व शहाणपण पुष्कळ मिळाले. व्यापाराच्या निमित्ताने सामाजिक परिस्थिती न्याहाळता येईल या विचाराने त्यानी व्यापारी पेशा पत्करला.
मक्का शहरातील अत्यंत समृध्दशाली व प्रतिष्ठित घराण्यातील खदिजाशी वयाच्या पंचविसाव्या वर्षी त्यांचे लग्न झाले. खदिजा मुहम्मदांपेक्षा १५ वर्षानी मोठ्या शिवाय विधवा होत्या, मुहम्मद यांचे सौंदर्य, सच्चेपणा, दयाशील वृत्ती, दिलदार स्वभाव पाहून खदिजाने त्यांच्यावर निस्सिम प्रेम केले. मुहम्मद यांचेही खदीजाबीवर अतिशय प्रेम होते. तिचा सल्ला घेतल्याशिवाय ते कोणतेही काम करीत नसत. इस्लाम धर्म प्रचाराचे बिकट व अचाट कार्य मुहम्मदांनी केले त्याचे बरेचसे श्रेय खदिजाबीस दिले पाहिजे. एका स्त्रीची प्रेरक शक्ती इस्लाम धर्माची मुहूर्तमेढ रोवण्यास कारणीभूत झाली ही गोष्ट अतिशय विलक्षण आहे.
मुहम्मदांनी आपले कार्य सुरू केले त्यावेळी राज्यपध्दती अस्तित्वात नव्हती. जो प्रबळ तोच सत्ताधारी होता. लोक टोळ्याटोळ्यांनी रहात. क्षुल्लक गोष्टीवरून रक्तपात घडत असे. गरीब स्वभावाच्या माणसाने केलेली न्यायाची गोष्ट अन्यायाची ठरत असे. तत्कालीन लोकांना जबाबदारीची जाणीव नव्हती. प्रत्येक टोळी स्वत:स श्रेष्ठ समजून दुसऱ्या टोळीवर बेलाशक हल्ला करी. वेडगळ समजुतींच्या आहारी पडून त्यांची प्रखर बुध्दीमता निकामी झाली होती. लुटमार व दरोडे घालणे हा कित्येकांचा कायमचा पेशाच होता. जिकडे पहावे तिकडे मूर्ती बसवलेल्या होत्या. या मूर्तीपुढे हजारो जिवांची हत्त्या होई. मूर्तीसमोर नरबळीही दिले जात. लोक अनेक व्यसने करीत. गल्ली-गल्लीत जुगार खेळला जाई व माणसांची गुलाम म्हणून विक्री होई. मुहम्मदांनी ही सर्व परिस्थिती बदलण्यासाठी आपले आयुष्य वेचले.
मुहम्मद पैगंबर यांची शिकवण:
मक्का येथे त्यांचे अनुयायी वाढू लागले तेथे दररोज लोकांसमोर ते प्रवचन देताना सांगत, प्रत्येक सत्कार्य म्हणजे परोपकारच होय. लोकांना सन्मार्गावर आणण्याकरीता उपदेश करणे हे परोपकाराइतकेच पुण्यकृत्य आहे. चुकलेल्या वाटसरूस वाट दाखविणे, आंधळ्यास सहाय्य करणे, रस्त्यावर पडलेले काटे-कुटे, दगड-धोंडे दूर करणे, तहानलेल्यास पाणी देणे या सर्व गोष्टी तुम्ही आचरणात आणा. मनुष्याची खरी संपत्ती म्हणजे त्यांनी केलेली सत्कार्ये होत.
जगातील सर्व मानवात प्रेम व सहानुभूती उत्पन्न झाली पाहिजे असे ते सांगत. परमेश्वराने निर्माण केलेल्या मानवजातीवर जो प्रेम करीत नाही, त्याच्यावर परमेश्वर कधीही प्रेम करणार नाही. आपल्या मुलांबाळावर, आपल्या आप्तेष्टावर, आपल्या देशबांधवावर जगातील यच्चयावत मानवांवर आपण प्रेम कराल तर आपणावर परमेश्वर संतुष्ट होईल. परमेश्वराची भक्ती करू इच्छिता तर प्रथम आपल्या बांधवावर प्रेम करा. दुसऱ्याच्या अंत:करणात प्रेम उत्पन्न होईल अशा तऱ्हेचे आचरण ठेवा. रक्तपात किंवा अनाचार करून तुमचा केंव्हाही उद्धार होणार नाही. तुमचा कट्टर शत्रू असला तरी त्याच्याशी प्रेमाने वागा. प्रेम हे इस्लाम धर्मातील महान तत्व आहे. तुमच्या हृदयात द्वेष बुध्दीस थारा देवू नका. द्वेषाने चांगल्या भावना देखील गढूळ होतील. अन्यायाची एकही गोष्ट करू नका. स्त्रियांचा मान राखत जा. स्त्रियांना दयाळूपणाने वागवा. स्त्रियांची इज्जत राखा आणि तुमच्या प्रत्येक कार्यात त्यांना भागिदार करा, तुमच्या नोकर-चाकरांशी प्रेमाने वागा. तुम्ही खाल ते अन्न व तुम्ही वापराल ते वस्त्रे त्यांना द्या. त्यांच्या शक्तीबाहेरचे काम त्यांना करण्यास सांगू नका. त्या सर्व शक्तिमान विधात्यास शरण जा. त्याच्याजवळ मनोभावे प्रार्थना करा तो दयाधन तुम्हा-आम्हा सर्वांचा उद्धार करणारा आहे.
मुहम्मद पैगंबर यांची वृत्ती अत्यंत साधी होती. ऐश्वर्य, ऐषआराम व बडेजाव यांचा त्यांना तिटकारा होता. अंगावरचा कपडा फाटला तर स्वतः ठिगळ लावून ते वापरत असत. घराची झाडलोट करणं, विस्तव पेटविणे, बाजारहाट करणे इ. कामे ते स्वत: करीत. त्यांची वृत्ती साधी व अपरिग्रही होती.
मुहम्मद पैगंबर हे थोर व दृढनिश्चयी सुधारक होते. अविश्रांत परिश्रम करून त्यांनी अधःपात झालेल्या जनतेस खऱ्या धर्माचा मार्ग दाखविला व ८ जून ६३२ रोजी समाधानाने नामस्मरण करत करत जगाचा निरोप घेतला.