गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२०

लाल बहादूर शास्त्री: विशेष मराठी लेख


लाल बहादूर शास्त्री

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


    मूर्ती लहान कीर्ति महान असलेले भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मुगलसराई या गांवी २ ऑक्टोबर १९०४ साली झाला. घरची अत्यंत गरिबी होती. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन त्यांनी काशी विद्यापीठाची 'शास्त्री' ही पदवी मिळविली. तेथील प्राध्यापक डॉ. भगवान दास यांचा त्यांच्यांवर फार मोठा प्रभाव पडला. त्यामुळे ते पुरोगामी विचारसरणीचे आणि समन्वयवादी बनले. महात्मा गांधीजींच्या सहवासाने स्वातंत्र्यलढ्यात उतरले. सत्याग्रहात भाग घेतला. ९ वर्षे त्यांनी तुरुंगात काढली. स्वातंत्र्यानंतर पंडीत नेहरूजींच्या मंत्रीमंडळात ते रेल्वेमंत्री, गृहमंत्री होते. पंडीत नेहरूंच्या नंतर ते भारताचे दुसरे पंतप्रधान झाले. अखेरपर्यंत ते गरिबीतच राहिले. त्यांच्या शुद्ध, सात्विक, निर्मळ, कणखर जीवनाचा आदर्श आपल्या सर्वांना घेण्यासारखा आहे. 'जय जवान, जय किसान' हा त्यांचा संदेश आजही सर्वांनी आचरणात आणला पाहिजे. जवान आणि किसान यांचा सन्मान केला पाहिजे. दि. ११ जानेवारी १९६६ मध्ये रशियातील ताश्कंद येथे त्यांचे निधन झाले.


     अशा या थोर नेत्याच्या बालपणातील एक आठवण इथे नमूद कराविशी वाटते.....।


       आयुष्यात अगदी लहान सहान गोष्टींमधून देखील खूप कांही शिकता येते. छोटा नन्हे अशा छोट्याशा गोष्टीकडे अधिकच लक्ष द्यायचा, ती त्याची वृत्तीच होती. नन्हे शाळेत शिकत असताना एकदा कांही शाळा सोबत्यांंसह तो एका बागेत गेला. ही सर्व मुले त्या बागेत हसत खेळत फिरु लागली. बागेत फिरत असताना रसाळ फळे लगडलेली तेथील कांही झाडे पाहून अगदी स्वाभाविकपणे त्या लहान मुलांच्या तोंडाला पाणी सुटले. इकडे तिकडे पाहून आजूबाजूला कोणीही नाही याची खात्री करून घेऊन ती सर्व मुले अगदी आनंदाने त्या फळांच्या झाडांवर चढली. नन्हेसुद्धा त्या सर्वांसोबत एका झाडावर चढला. झाडावरच बसून फळे तोडून मुले त्या फळांचा आस्वाद घेऊ लागली. फळे खाण्यात मुले अगदी मग्न झाली होती. इतक्यात त्यांच्यापैकी एका मुलाचे लक्ष  बागेपुढच्या रस्त्याकडे गेले. त्याने पाहिले तर त्याला त्या बागेचा माळी येत असल्याचे दिसले. तो माळीबाबा बागेच्या दिशेनेच येत होता. तो मुलगा चटकन् ओरडला, "अरे बागेचा माळी आला। चला चला पटकन् पळा।" त्या मुलांचा हा ओरडा ऐकून घाबरलेल्या सर्व मुलांनी झाडावरून पटापट उड्या मारल्या व ती पळूनही गेली.


     पण छोटा नन्हे मात्र झाडावरून उतरून त्याच झाडाखाली हात बांधून उभा राहिला. माळी रागारागाने आला व त्याचा हात धरून वाट्टेल तसे बोलू लागला. नन्हेला चार दोन गुद्दे लगावण्यासाठी त्याने आपला हातही उचलला. तेंव्हा नन्हे त्या माळ्याला म्हणाला, "माळीदादा मला मारू नका, मी खूपच गरीब आहे. मला वडील नाहीत!" माळी म्हणाला, "मग तर तू असे अजिबात वागता कामा नये. तू चांगले वागलेच पाहिजेस. इतर मुलांपेक्षा चांगले वागण्याची तुझ्यावर अधिक जबाबदारी आहे. जा पण पुन्हा असं करू नकोस!" माळ्याने त्याचा हात सोडला आणि नन्हे भरल्या डोळ्यांनी जड पावले टाकत निघाला.माळ्याच्या उपदेशाचा त्याच्या मनावर खोल परिणाम झाला. त्याने चांगले वागण्याची शपथ घेतली व तशी कृतीही केली.


      हा नन्हे म्हणजे आपले माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री हे होते.


अशा या थोर विभूतीला कोटी कोटी प्रणाम।