सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

श्री गणपती बाप्पांना पत्र - विशेष मराठी लेख

 

श्री गणपती बाप्पांना पत्र

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गुगल


प्रेषक,

सर्व त्रस्त भक्त


आदरणीय गणपती बाप्पा,

सस्नेह वंदन, कळकळीची विनंती विशेष।


       आम्ही सर्वजण तुमची आतुरतेने वाट पहात आहे कारण गेली सहा महिने तुमचे सारे भक्तजन मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यांना घरातून बाहेर पडायचीसुद्धा भिती वाटू लागली आहे. उजळ मनाने, मोकळ्या चेहऱ्याने, निर्भयपणे फिरणे इतिहासजमा झाले आहे. तुम्हीच सांगा गणराया घरातच बसून गोरगरिबांनी खायचं काय? उपाशी राहून मरायचं? का कोरोनानं मरायचं? तोंडाला मास्क, हाताला ग्लोव्हज घालून सर्व काळजी घेऊनही कोरोना हटेनासा झालाय. गणराया तुम्ही विघ्नविनाशक आहात मग एवढं मोठ्ठं विघ्न आलेलं असताना गप्प कसे बसू शकता? कांहीतरी करा आणि तुमच्या लाडक्या भक्तांना या संकटातून मुक्त करा.


    गणेशदेवा, यावर्षी तुमचे आगमन एका वेगळ्या परिस्थितीत होत आहे. कोरोनाच्या भितीने भक्तांनी जीव मुठीत धरला आहे. कोरोना केंव्हा, कसा, कोणाकडून आपल्याकडे येईल हे सांगता येत नाही. दररोज कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. दररोज सांगितले जात आहे की आजची संख्या उच्चांकी आहे. लाखो लोक कोरोनाला बळी पडत आहेत. कित्येकांचे प्रिय नातेवाईक यमसदनी गेले आहेत, जात आहेत. कित्येकांच्या संसाराचा डाव अर्ध्यावर मोडला आहे. कित्येकांचे संसार पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत. कित्येक अनाथ झाले आहेत. मरणाच्या उंबरठ्यावर असताना कुणाचीच गाठभेट होईनाशी झाली आहे. प्राणप्रिय व्यक्ती चे शेवटचे दर्शनही दुर्लभ झाले आहे. मला सांगा गणराया, हे सगळं तुम्ही पहात बसलाय, जराही दया येत नाही तुम्हाला?


     गणपती बाप्पा, प्रेतांना लाकडी ओंडक्याचे स्वरूप आले आहे. एकावर एक रचून स्मशानभूमीत नेले जात आहेत. प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात न देता परस्पर विल्हेवाट लावली जात आहे. नातेवाईकांना जिवंतपणी मरणयातना सोसाव्या लागत आहेत. कांहीं ठिकाणी कोरोनाच्या भितीमुळे प्रेत ताब्यात घेण्यास असमर्थता दाखविली जात आहे. लॉकडाऊनमुळे माणसं माणसापासून दूर जात आहेत.


      गणराया बाकी समाधानाची बाब एवढीच की डॉक्टर्स, नर्सेस्, आरोग्य कर्मचारी, पोलिस यंत्रणा,  शिक्षक, सफाई कामगार या सर्वांमध्ये माणुसकीचे दर्शन होत आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून एखाद्या योद्धा प्रमाणे लढत आहेत. माणसांना कोरोनापासून वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या कुटुंबाची, मुलांबाळांची काळजी उरात साठवून ते आपले कर्तव्य पार पाडत आहेत जनतेचा जीव वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करणारे डॉक्टर्स, नर्सेस्, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, पोलिस व यंत्रणेतील सदस्य मरण पत्करत आहेत. या सर्वांबद्दल गणराया, तुम्हाला कांहीच कसं वाटेनासं झालं आहे?


      बाप्पा, बरेच उद्योगधंदे, कारखाने, कंपन्या बंद पडल्या आहेत. हाताला काम नसल्याने जीवनात राम नाही असे समजून कित्येकांनी जीवनयात्रा संपविण्याचा मार्ग धरला आहे. तरी देवा तुम्ही गप्प कसे?


      तुम्ही विद्धेचे दैवत आहात. पण सर्व विद्धेची मंदिरे बंद झालीत. शाळेत मुक्तपणे बागडणारी मुले घराच्या चार भिंतीत बंदिस्त झाली आहेत. टी.व्ही. आणि मोबाईलवर ऑनलाईन शिक्षण घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण ही केविलवाणी धडपड आहे. पदवी घेण्यास आतुर झालेले विद्यार्थी परीक्षेची प्रतिक्षा करून मेटाकुटीला आले आहेत. उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या कित्येक विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली आहेत.


       माणसाने निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न केला. निसर्गाचा ह्रास करण्याचा, पर्यावरणाचा समतोल बिघडविण्याचा सपाटा लावलाय हे आम्हाला मान्य आहे गणराया. तुमच्या उत्सवाला वेगळं रूप देण्याचा प्रयत्नही आमच्याकडून होत आहे हेही मान्य आहे. पण या चुका सुधारण्याचाही प्रयत्न होत आहे.


  डॉल्बीच्या दणक्याने तुमच्या कानठळ्या बसतात म्हणून डॉल्बी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्माल्या पासून खत तयार करण्याचं विधायक कार्य समाजसेवकांनी हाती घेतले आहे. ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण, जलप्रदूषण रोखण्यासाठी शासनाने कांही नियम घालून दिले आहेत. नियमानुसार कार्यवाही बऱ्याच ठिकाणी चालू आहे. गणराया, कांही थोड्या लोकांच्या चुकांसाठी सर्वांना वेठीस धरू नका. त्यामुळे निष्पाप लोकांचा हकनाक बळी जातोय देवा. भक्तांची चूक तुमच्याशिवाय कोण पदरात घेणार? हे सगळं जाणत असूनही का कानाडोळा होतोय तुमच्याकडून?


    दरवर्षी तुमच्या आगमनाने फुलून येणारा उत्साह यावर्षी कोपऱ्यात लपून बसला आहे. आबालवृद्धांच्या आनंदावर कोरोनाचे विरजण पडले आहे. सर्व तरुण गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची अवस्था पंख कापलेल्या पक्षांप्रमाणे व्याकुळ झाली आहे. यावर्षी गणपतीबाप्पांचे स्वागत कसे करावे, कोणता देखावा उभारावा, कोणत्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, कोणत्या स्पर्धा घ्याव्यात, व्याख्यानाला कुणाला निमंत्रण द्यावे या विचारात दंग होणाऱ्या सर्वांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. कोरोनाच्या भितीने पोटात गोळा उठला आहे कारण कोरोना परदेशातून थेट उंबरठ्यावर येऊन बसला आहे. तो कधी येऊन जीव घेईल सांगता येत नाही. गणपती बाप्पा खूप घाबरून गेलोय आम्ही. आमच्या जिवावर बेतलेलं हे कोरोनाचं संकट तुम्हीच दूर करू शकता. या कोरोनाला हाकलून लावण्याची शक्ती तुमच्याकडेच आहे गणराया. कोरोनाची लस लवकरात लवकर पाठवून आम्हाला वाचवं. सर्व भक्त तुला कळकळीची विनंती करतो. लोभ आहेच आणखी वाढव.


शेवटी एक प्रार्थना करते तिचा स्विकार कर.


जोडोनिया कर तव चरणांवर

नमितो तुजला, गणराया, गणराया


संकटसमयी धावुनी येई

चूक भक्तांची पदरी घेई

चौदा विद्धेचा तू पाया गणराया


विनंती आमुची चरणी गणेशा

सुखवी माझ्या भारत देशा

हेच मागणे तुज पाया गणराया।


तुझे कृपाभिलाषी,

सर्व कोरोनाग्रस्त व कोरोनात्रस्त भक्तगण।