" असे हे पती! "
लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी
माझी मैत्रिण पुष्पा हिने तिच्या मिस्टरांकडे म्हणजेच माझ्या दाजींकडे नेकलेस करण्याचा हट्ट धरला होता. तिला नेकलेस घालून मिरवायची फार हौस होती. सुरुवातीला त्यांनी नकार दिला, पण पुष्पा नाराज झाली हे पाहून त्यांंनी नाही हो म्हणता होकार दिला, परंतु एका अटीवर. पुढच्या महिन्यात पुष्पाच्या भाचीचं लग्न होतं. त्या लग्नात तिने नेकलेस सुटकेसमधून न्यायचा, पण गळ्यात घालायचा नाही, कुणालाही दाखवायचा नाही. कुणालाही नेकलेस केला आहे असं सांगायचं नाही. जर या अटींपैकी एखादी गोष्ट तिच्या हातून घडली, तर पुढील दहा वर्षांत पुन्हा एकही दागिना मागयचा नाही. पुष्पाने विचार केला अटी पाळणे अवघड आहे पण एकाच कार्यक्रमाचा तर प्रश्न आहे. पुष्पाने असा विचार करुन दाजींना म्हटलं, "ठीक आहे, मला तुमच्या सर्व अटी मान्य आहेत."
अगदी मनासारखा नेकलेस तयार झाला. लग्नास जातांना सुटकेसमध्ये पुष्पाने आठवणीने नेकलेस घेतला. लग्नाच्या दिवशी दाजी डोळ्यात तेल घालून पुष्पाच्या पाळतीवर होते. पुष्पाला कित्येक वेळा आईला, बहिणींना, भावजयीला नेकलेस दाखविण्याचा मोह झाला पण तिने मोठ्या प्रयासाने मोह आवरला. लग्न पार पडले, लांबचे पाहुणे निघून गेले, रात्रीचे जेवण झाले, पुरूष मंडळी माडीवर झोपण्यासाठी निघून गेली, बायकांची आवराआवर झाली. आत्ता मात्र पुष्पाला चैन पडेना. तिने माडीवरचा अंदाज घेतला. सर्वजण झोपी गेल्याची तिची खात्री झाली. तिने हळूच सुटकेसमधून नेकलेस काढून घेतला व सर्वांना कौतुकाने दाखवू लागली. नेमक्या त्याच वेळी दाजी खाली येत म्हणाले, "छान, माझी पुढची दहा वर्षे सुटका झाली दागिन्यातून." पुष्पाची अवस्था मात्र पुतळ्यासारखी झाली.
तर 'असे हे पती' महाचलाख!