कोरोनाने आपल्या जीवनात प्रवेश केला आणि आपलं सुंदर जग बदलून गेले. माणसं माणसापासून दूरपर्यंत गेली की काय? ते पहा या भावस्पर्शी कवितेतून.....
" कोरोनापूर्वीचं जग..."
लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी
कोरोनापूर्वीचं जग किती सुंदर होतं
उघड्या तोंडानं फिरता येत होतं।
आता नाकातोंडाला झाकावं लागतं
घरात बसून बसून गुदमरावं लागतं।
फुलासारखी मुलं शाळेत जात होती
हसत, खेळत, बागडत शिक्षण घेत होती।
आज आहेत बिचारी घरातच दबलेली
टी.व्ही. मोबाईलद्वारे शिकत असलेली।
सासरच्या चिमण्या माहेरी येत होत्या
माहेरच्या मायेने चार्ज होत होत्या।
आज त्या चिमण्या त्यांच्याच घरी बसल्या
माहेरच्या आठवणीने व्याकुळ होऊ लागल्या।
लेकरांच्या लग्नाची हौस मोठी होती
धुमधडाक्यात लग्नाची जुळणी केली होती।
मिळे आता सवलत पन्नास माणसांची
माती झाली मिरवायच्या हौस मौजेची।
देवाआज्ञा झाल्यावर नातलग जमत होते
दुःखाचा भार हलका करत होते।
आता अंत्यविधी नातलगाविना झाले
चारसुदधा कर्मचारी मिळेनासे झाले।