रविवार, २ ऑगस्ट, २०२०

मनी रुजलेले विद्यार्थी - मराठी लेख


मनी रुजलेले विद्यार्थी

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी

फोटो साभार: pixabay.com


     साधारण वीस वर्षापूर्वी माझ्या वर्गात सुरेखा नावाची मुलगी होती. इयत्ता पाचवीत शिकत होती. तिचे आईवडील भाजी आणि मटकीमोड विकण्याचा व्यवसाय करत होते. घरकाम, स्वयंपाक, छोट्या दोन भावंडांना साभाळण्याचं काम ती करत होती. घरच्या या आर्थिक परिस्थितीने सुरेखाला अकालीच प्रौढ केले होते. 

      एके दिवशी शाळा सुटल्यावर  मिटींग आटोपून शाळेजवळच असलेल्या मंडईत गेले. सुरेखा मटकी मोड विकत बसली होती. तिचे बाबा बाजूलाच भाजी विकत बसले होते. मला पाहून ती म्हणाली, "मॅडम माझी आई आजारी आहे, म्हणून मी आज शाळेला आले नाही. बाबांना एकट्याला गिऱ्हाईक आवरत नाही म्हणून मी आलेय मदतीला." मी म्हणाले, "ठीक आहे, मला मटकीमोड दे दहा रुपयाचे." मला डोळ्यानीच तिनं सांगितले, जरा थांबा आणि गिऱ्हाईकाना मटकीमोड देवू लागली. मोड मोजून पुडीत घालणे, पुडी बांधणे यातील तिचं कौशल्य मी न्याहाळू लागले. मला आश्चर्य वाटले वर्गातील अभ्यासात यथातथा असणारी सुरेखा अगदी सफाईदारपणे गिऱ्हाईकाना माल देत होती. पैसे मोजून घेत होती. पाच मिनिटे झाली, ह्या वेळेत आठ गिऱ्हाईक देऊन झाली. मला उगीचच थांबवलय म्हणून थोडासा रागही येऊ लागला. 

       हळूहळू गिऱ्हाईक कमी झाली. समोर मी एकटीच असल्याची खात्री करुन तिने मागे ठेवलेल्या सामानातून एक पिशवी काढली व बुट्टीत ओतली. ताजे ताजे टपोरे मोड दिसू लागले. ते पुडीत बांधत सुरेखा म्हणाली, "मॅडम तुम्हाला जरा थांबावे लागले माफ करा." मी मघापासून गिऱ्हाईकाना मटकीमोड दिले ना, ते कालचे शिळे होते. माझ्या मॅडमना जरा ताजे ताजे मटकीमोड द्यावेत म्हटलं." मी दिलेली दहा रूपयांची नोट पोत्या खाली ठेवून ती दुसऱ्या गिऱ्हाईकाना माल देवू लागली. मी मात्र आश्चर्यचकित झाले सुरेखाचा चतुरपणा पाहून!

असे आहेत माझ्या  मनाच्या खोल कप्प्यात जपून ठेवलेले विद्यार्थी.