रविवार, १९ जुलै, २०२०

"अशी बनते कविता माझी" - मराठी कविता


"अशी बनते कविता माझी"

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी



विचारांचा येतो पूर
तेंव्हा शब्द पळतात दूर दूर
भावनाच मारतात बाजी
अशी बनते कविता माझी ।।१।।

वृतांचे नाही ज्ञान
अलंकाराची नाही जाण
कळ्याविनाच फुले उमलती ताजी
अशी बनते कविता माझी ।।२।।

भाषा ज्ञान असे थोडे
अनुभव येती लाडे लाडे 
मग प्रतिभा होत राजी
अशी बनते कविता माझी ।।३।।

विषय सुचता समय नसे
समय असता शब्द न गवसे
बिन बियांची उगवते भाजी
अशी बनते कविता माझी ।।४।।

लंगड्या असुनी भावना
करती तुझी साधना 
प्रार्थना शारदे तुला हीच माझी
अशी बनते कविता माझी ।।५।।