"सुसंवाद वाढवा, आत्महत्या टाळा"
लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी
आमच्या शेजारच्या मुलीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम थाटामाटात करण्याचे ठरले होते. अर्थात हा प्रसंग फेब्रुवारी २०२० मधील आहे. डोहाळे जेवणाची तयारी पंधरा दिवस आधी सुरू होती. गर्भवतीसाठी वेगवेगळे पदार्थ तयार करण्याचे सत्र चालू होते. तिच्या सासरी भाऊबंदाचा बुडका मोठा असल्याने तिच्या सासूबाईनी सर्वांना पुरेल, अशी भरपूर शिदोरी आणण्यासाठी सक्त सूचना दिल्या होत्या. दिलेल्या सूचनेनुसार शिदोरी घेऊन हे लोक जेंव्हा तिच्या सासरी पोहचले तेंव्हा तिच्या घरात सर्व सामसूम दिसले. घरात कोणीच दिसेना. गर्भवती एका कोपऱ्यात अश्रू ढाळत बसली होती. याबाबत विचारपूस केल्यावर समजले की, तिच्या चुलत दिराच्या एकुलत्या एक बारा वर्षाच्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्याला उत्तरीय तपासणीसाठी तालुक्याच्या गावी नेले आहे. घरचे सर्व लोक तिकडेच आहेत. एका आनंदाच्या कार्यक्रमावर दुःखाचे सावट पडले होते.
झाले होते काय... तो मुलगा आठवीत शिकत होता. या कार्यक्रमासाठी तो शाळा चुकवून थांबू इच्छित होता. आईने त्याला सक्ती केली की, तू शाळेत जा शाळा चुकवू नकोस. हा कार्यक्रम स्त्रियांचा असतो. तुझे इथे काहीही काम नाही. आई पलीकडच्या घरात कार्यक्रमाची तयारी करायला गेल्याचे पाहून या मुलाने माडीवर जाऊन हा प्रकार केला होता. याला काय म्हणावे?
अशा क्षुल्लक कारणावरुन मुलं
आत्महत्या करत आहेत. पेपर अवघड गेला, व्हेकेशनमुळे गावाला जाता आले नाही, मित्राशी भांडण झाले, मोबाईल घेऊन दिला नाही, गाडी घेऊन दिली नाही, पालक किंवा शिक्षक रागावले इत्यादी कारणे
आत्महत्या करण्यासाठी पुरेशी ठरत आहेत. जी गोष्ट मुलांच्या बाबतीत तीच गोष्ट मोठ्यांच्या बाबतीत घडत आहे. कर्ज झाले, पिके वाया गेली, नैराश्य आले, आजारपण आले की आत्महत्येचीच वाट धरली जात आहे. जागतिक संघटनेच्या अहवालात सर्वाधिक
आत्महत्या भारतात होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. देशात आर्थिक बाबतीत आघाडीवर असलेला महाराष्ट्र आत्महत्येतही नंबर वन् असल्याचे समोर आले आहे. या सर्व बाबींचा जाणीवपूर्वक विचार आपण करणार आहोत की नाही.
हे असे का होत आहे? आयुष्यात आता अर्थ राहिला नाही, अशी भावना प्रबळ झाल्यावर व्यक्ती आत्महत्येचा मार्ग निवडते. हल्ली कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी होत असून, एकमेकांची सुख-दुःखे ऐकण्यासाठी कुणाला वेळ नाही. फॅमिली सपोर्ट सिस्टीम नसल्याने व्यक्तीमध्ये निराशा लवकर येत आहे.एखाद्याने आत्महत्येचा विचार बोलून दाखवला तरी त्या कडे सोयिस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे.
आत्महत्येपर्यंत पोहचण्याचे सर्वसाधारण तीन टप्पे आहेत. पहिला आत्महत्येचा विचार बोलून दाखविणारा, दुसरा विचार आणि प्रत्यक्ष कृतीचा प्रयत्न करणारा आणि तिसरा थेट कृतीचा. संबंधित व्यक्तीला पहिल्या टप्प्यावर मानसिक आधार मिळाल्यास तो आत्महत्येपासून परावृत्त होवू शकतो पण त्याला कुटूंबाकडून मानसिक आधार मिळत नाही. ही तर शोकांतिका आहे. अलीकडे कुटुंबातील व्यक्तींचा एकमेकाबद्लचा जिव्हाळाच कमी होत चालला आहे. एकमेकांशी होणारा सुसंवाद कमी होत चालला आहे. पूर्वी कुटुंबातील एकाला काटा टोचला तर दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी यायचे. आज काटा लागल्याचे पहायलाच कुणाला सवड नाही. पाहिले तरी कुठेतरी जायच्या गडबडीत खाली बघून चालता येत नाही का तुला एवढे काळजीपूर्वक म्हटले जाते. फार झाले तर दवाखान्यात जावून ये, का डॉक्टरांना फोन करून यायला सांगू, एवढे काही ठिकाणी म्हटले जाते त्यामुळे सलणारा काटा पायातच रूतत जातो.
कुटुंबातील एक व्यक्ती
आत्महत्या करून जीवनयात्रा संपवतो मात्र मागे राहिलेल्या कुटुंब कबिल्याची अवस्था दयनीय होते. अख्ख कुटुंब उध्वस्त होतं. कुटुंबातील एकमेव आधार असलेली मिळवती व्यक्ती जेंव्हा
आत्महत्या करते तेंव्हा त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या इतरांची अवस्था मेल्याहून मेल्यासारखी होते. जेंव्हा कुटुंबाचा भावी आधारस्तंभ
आत्महत्या करतो, तेंव्हा त्यांच्या पालकांना जिवंतपणीच नरकयातना भोगाव्या लागतात. हे सर्व वेळीच थांबवावे लागेल यासाठी कुटुंबातील व्यक्तींचा एकमेकातील सुसंवाद वाढवावा लागेल. कुटुंबातील सदस्यांचे रात्रीचे जेवण कोणत्याही परिस्थितीत एकत्र झाले पाहिजे. एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा झाल्या पाहिजेत. एकमेकांच्या सुखदुःखाचं शेअरिंग झालं पाहिजे. सर्वांना मन मोकळं करण्याची संधी मिळाली पाहिजे. कराल ना हे सगळं? टाळाल ना
आत्महत्या?