सोमवार, २४ जून, २०२४

मी अनुभवलेला एक अपूर्व कौटुंबिक सोहळा


मी अनुभवलेला एक अपूर्व कौटुंबिक सोहळा 


✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


सौ. व श्री. मुकूंद गनबावले आणि सौ. व श्री. दिलीप गनबावले

     









२४ मे २०२४ रोजी सत्कारमूर्तींची धान्यतुला स्वामीसमर्थ मंदीर जयसिंगपूर येथे



श्री. मिलिंद गनबावले सर्व उपस्थितांना दंडवत घालताना
 




उपस्थित गनबावले कुटुंबीय


       आदरणीय मुकूंद गनबावले परिवार जयसिंगपूर यांनी आयोजित केलेला हा अपूर्व सोहळा १६ मे २०२४ ते २५ मे २०२४ या कालावधीत तीन टप्प्यामध्ये पार पडला, निमित्त होतं संभाजीपूर ज्येष्ठ नागरिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री. मुकूंद गनबावले यांनी वयाची ८१ वर्षे पूर्ण झाली म्हणून सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा व त्यांचे धाकटे बंधुराज आदरणीय श्री. दिलीप गनबावले व त्यांच्या सुविद्य पत्नी सुषमाताई या दोघांची वयाची ७५ वर्षे पूर्ण झाली म्हणून त्यांचा अमृतमहोत्सव असा संयुक्त नितांतसुंदर कौटुंबिक सोहळा.


       २५ मे २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता सहस्त्रचंद्रदर्शन व अमृतमहोत्सव सोहळा कृष्णा हॉल, नांदणी रोड जयसिंगपूर येथे संपन्न होणार होता. या सोहळ्याचे आमंत्रण संभाजीपूर ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या मासिक मिटिंगमध्ये देण्यात आले. आग्रहाचं निमंत्रण कसं असावं याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे गनबावले बंधूंनी दिलेलं निमंत्रण. निमंत्रण देताना ते म्हणाले, "हा सोहळा आमचा कौटुंबिक सोहळा आहे आणि तुम्ही सर्वजण आमचे कुटूंबीय आहात म्हणून तुम्हा सर्वांना सहकुटूंब उपस्थित राहण्याचं आग्रहाचं निमंत्रण! आणि हो आज जे सभासद उपस्थित नाहीत त्यांनाही निमंत्रण द्यायचं काम तुम्हीचं करायचं बरं का!" या आपुलकीने आणि आग्रहाने दिलेल्या निमंत्रणात त्या बंधुंच्या मनाचा जो मोठेपणा दिसला तो शब्दात सांगणे कठीण.


       गनबावले कुटूंबियानी हा सोहळा तीन टप्प्यात साजरा केला. १६ मे २०२४ रोजी संभाजीपूर, जयसिंगपूर येथे ऋध्दी-सिध्दी या निवासस्थानी सर्व नातेवाईकांच्या उपस्थितीत "होमहवन" मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरे केले. २३ मे २०२४ रोजी सत्कारमूर्तींची धान्यतुला स्वामीसमर्थ मंदीर जयसिंगपूर येथे केली. या मंदिरातून दररोज २२ हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेल्या रूग्णांना व त्यांच्या एका नातेवाईकाला मोफत डबे पुरविले जातात. या अभिनव उपक्रमाला सहकार्य करण्याची नामी संधी या कुटूंबाने घेतली. गरजू बांधवांच्या मुखी प्रेमाचा घास भरविण्याचं परमभाग्य या कुटुंबाला प्राप्त झाले.


       सोहळ्याची सुरुवात त्यांच्या निवासस्थानापासून झाली. सत्कारमूर्ती सौ. व श्री. मुकुंद गनबावले,सौ व श्री. दिलीप गनबावले यांना त्यांच्या लेकी सुनांनी, नातींनी कुंकूम तिलक लावून आरती ओवाळली. आरती ओवाळतांना सत्कारमूर्तींबद्दलच्या आदराने चिंब झाल्या होत्या सर्वजणी. हा प्रसंग फारच नेत्रदीपक वाटला. दिलीप काकांचा टाय नीट करणारे व सुषमाकाकूना हात देणारे या कार्यक्रमास खास पुणे इथून आलेले फॅमिली फ्रेंड श्री. राजेश रुणवाल हे सर्वांना भावले.


       हॉलमधील आगमनासाठी निवडलेली वारकरी थीम कौतुकास्पद वाटली. आपले आजी आजोबा वारकरी होते. वर्षातून दोनदा ते पंढरपूरची वारी करत होते हे स्मरून सर्वानुमते ही थीम निवडली. या वारकऱ्यांचे कसे वर्णन करु? डोक्यावर तुळस घेतलेली नात एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला विठ्ठल-रखुमाई यांची सुरेख, साजरी मूर्ती घेऊन चाललेली नात. या दोघींच्या मागे पांढऱ्याशुभ्र पोशाखातील हातात टाळ घेऊन तालात नाचणारे वारकरी अर्थात त्यांची मुले, जावई, नातजावयी. अप्रतिम दृश्य होतं ते.


       पाठीमागे भव्य दिंडी पताका घेऊन डोलणारी कन्या व यांच्या मागे सत्कारमूर्ती. फारच स्वर्गीय होता तो प्रसंग. मनात भक्तीचं साम्राज्य निर्माण करणारा! क्षणभर पंढरपुरात असल्याचा भास झाला. म्हणावेसे वाटले,

अवघे दुमदुमले संभाजीपूर।

चालला मायेचा जागर।

       यथासांग पूजा पार पडल्यानंतर लगेचच 'सूर निरागस हो' या गाण्यावर शास्त्रोक्त नृत्य सादर करणारी परी धरतीवर अवतरली आजोबा आजीना आनंदी करण्यासाठी! या सुंदर सादरीकरणानंतर मुकुंद गनबावले यांचे चिरंजीव मिलींद यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, "फक्त देहाने पूजाअर्चा करण्यापेक्षा घरातील ज्येष्ठांची सेवा करावी". या कलियुगात ज्येष्ठांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा हे मिलींद यांचे वाक्य उपस्थितांच्या ह्रदयापर्यंत पोहोचले. त्यांनी आपले आईवडील, काकाकाकू व आत्या यांना शिरसाष्टांग नमस्कार केला व लगेचच उपस्थित सर्वांना अगदी मनापासून दंडवत घातला. हा साधासुधा दंडवत नव्हता, त्यात ज्येष्ठांबद्दलचा आदर काठोकाठ भरलेला होता. त्यांच्या या कृतीने त्यांची विनयशीलता, नम्रता तर होतीच शिवाय सर्वांसाठी हा आदर्श कृतीपाठ ठरला. उपस्थितानी हजारो आशीर्वाद त्यांच्या पदरी निश्चितच टाकले.


       कुटुंबातील लेकीसुनांनी, मुलांनी, जावयांनी, नातवंडांनी मिळून इतके सुंदर नृत्य सादर केले की विचारुच नका. भक्तीगीताची निवड परफेक्ट झाली. वेषभूषा साजेशी वाटली, नृत्यातील सहजसुंदरता मनाला स्पर्शून गेली.  कुठेही कृत्रिमता दिसली नाही. मनी भाव होता आनंदाचा आणि प्रेमाचा.


       सत्तर पेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठांचा सत्कार हे या सोहळ्याचं ठळक वैशिष्ट्य होतं. ज्येष्ठांना उपयोगी पडणारी स्टिलची बॉटल व मानाचं पान असलेला श्रीफळ आकर्षक पॅकिंगमध्ये ज्येष्ठांच्या हाती देणाऱ्याचा कृतार्थ भाव स्पष्टपणे दिसत होता. घेणाऱ्याच्या चेहऱ्यावर  समाधान दिसत होते. प्रभू रामचंद्रांनी शबरीची उष्टी बोरे आनंदाने खाल्ली होती प्रश्न फक्त बोरांचा नव्हता तिच्या श्रद्धा आणि भक्तीचा होता, तद्वत या भेटवस्तू देण्यामागील उद्देश तुम्हा कुटूंबियाच्या उदात्त भावनेचा होता. भेटवस्तू स्विकारतांना ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य लाखमोलाचे वाटले. कार्यक्रमात प्रश्नमंजूषा व फनी गेम्स घेऊन बक्षिसे देण्यात आली. आजोबांनी मिळवलेले बक्षिस त्यांच्या नातवंडापर्यंत पोहोचले त्यामुळे आजोबापासून नातवंडापर्यंत सर्वच खूश झाले.


       सत्कारमूर्तींचा जीवनपट उलगडण्यासाठी अर्थात मुलाखत घेण्यासाठी उपस्थित असलेली नातवंडे प्रोफेशनल मुलाखतकार वाटली. सूचक प्रश्न विचारून मोठ्या खुबीने त्यांनी दोन्ही आजोबांना बोलतं केलं त्यामुळे आपल्या पूर्वायुष्याबद्दल दिलखुलासपणे बोलण्याची संधी मिळाली. आजोबांच्या विद्यार्थी दशेतील यशाचं कौतुक केलं. पत्नीबद्दल असलेलं प्रेम, तिनं आयुष्यभर दिलेली खंबीर साथ याबद्दल बोलण्याची संधी मिळाली. भावांवरील उत्कट प्रेम प्रगट झालं. बालपणीच्या आठवणी विनोदी शैलीत सांगितल्या गेल्या त्यामुळे मधे मधे हास्यसरी  येत होत्या.


       सूत्रसंचलन करणाऱ्या दोघींच्या काव्य ओळी प्रेक्षकांना जगण्याचं बळ देऊन गेल्या. गनबावले आजोबांनी गायलेलं गाणं अजीब दास्ता है ये सर्वांना खूप भावलं. या सत्कारमूर्तीचं ज्यावेळी आगमन झालं त्यावेळी क्षणभर वाटलं श्रीराम लक्ष्मण सीता उर्मिला सह हजर झालेत की काय! दुसऱ्या क्षणी वाटलं ज्ञानदेव सोपानदेव मुक्ताबाई सह हजर झाले. ताईंचा केलेला यथोचित सत्कार सर्वांना फार आवडला. अशाप्रकारे मन आनंदाने व पोट चविष्ट भोजनाने भरणारा हा सोहळा सर्वांना अविस्मरणीय वाटला.


असा अपूर्व सोहळ्याचे नेटके संयोजन केल्याबद्दल गनबावले कुटूंबियांना मनापासून धन्यवाद।