१ जुलै हा डॉक्टरर्स डे, त्यानिमित्त डॉक्टरांचे मनोगत मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न.
मी डॉक्टर बोलतोय - विशेष लेख
प्रथमतः माझ्या सर्व पेशंटना नमस्ते। बंधू-भगिनींनो, माता-पित्यांनो, मित्र-मैत्रिणीनो प्रत्येकाचा एक स्पेशल दिवस असतो. एक जुलै हा माझा अर्थात माझ्या सर्व सहकारी बांंधवांचा स्पेशल दिवस आहे. म्हटलं आज तरी तुमच्याशी मनमोकळ्या गप्पा माराव्यात. एरव्ही आमचा दिवस सुरू होतो हॉस्पिटल मध्येच आणि मावळतोही हॉस्पिटल मध्येच. मला दिवसरात्र ऐकाव्या लागतात रूग्णांच्या व्यथा आणि वेदना. बघावे लागतात हवालदिल झालेल्या नातेवाईकांचे उदास, हिरमुसलेले चेहरे. रूग्णांच्या व्यथा वेदनांशी एकरूप होऊन अगदी मनापासून, विचारपूर्वक उपचार करून रुग्णांच्या व्यथा वेदना दूर करण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतो जराही न थकता, कारण डॉक्टर होण्याचा निर्णय घेतानाच मी मनाची तयारी केलेली असते की रूग्ण हेच माझे भाग्यविधाते आहेत. माझं कार्य, माझ्या जीवनाची यशस्वीता सर्वस्वी रूग्णहो तुमच्यावरच अवलंबून आहे. रुग्ण आपले दुःख कमी करण्यासाठी, वेदना दूर घालविण्यासाठी माझ्याकडे आलेला असतो. त्यांच्या विश्वासावरच आमची प्रॅक्टिस अवलंबून असते कारण माझ्या हातून बरा झालेला रूग्ण माझी आयुष्यभर आठवण तर ठेवतोच शिवाय आणखी दहा- वीस जणांना माझ्याबद्दल सांगतो आणि अशी ही अनुभवी जाहिरात माझ्या चांगलीच पथ्यावर पडते.
माझ्याकडून माझ्या पेशंटना खूप मोठ्या अपेक्षा असतात. माझा नातेवाईक शंभर टक्के बरा झालाच पाहिजे असे प्रत्येक नातेवाईकाला वाटत असते. त्यांचे असे वाटणे स्वाभाविक आहे. पण त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की डॉक्टर तुमच्या व्यथा-वेदना दूर करू शकतात पण तुमचे जीवन चिरंजीव करु शकत नाहीत. तो अधिकार अजून तरी ईश्वराने कुणाकडे दिलेला नाही.
माझ्या कांही मित्रांच्या नशिबी आनंदाचे क्षणही येतात. तुम्ही म्हणाल ते कसे काय? तर ते स्त्री रोग तज्ज्ञ आहेत. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये दररोज अनेक बालके जन्म घेतात. तुम्हाला मुलगा झाला, धास्तावलेल्या नातेवाईकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्यावेळचे सर्व नातेवाईकांचे चेहरे आनंदाने प्रफुल्लित झालेले असतात आणि असे उजळलेले चेहरे बघणे हा आमच्या दृष्टीने सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो. मुलगी झाली हे ऐकून उदास चेहरेही बघावे लागतात. त्यांना समजावून सांगावी लागते मुलींची महती.
कांही वेळा माझा कांहीएक दोष नसतो, आणि ती माता दगावते नि सगळा दोष माझ्या माथ्यावर देऊन नातेवाईक मोकळे होतात. अशावेळी पेशंटच्या नातेवाईकांनी संयमाने वागावे लागेल. माझ्याशी, इतर तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा करायची सोडून हॉस्पिटलची तोडफोड करतात. लाखोंचे नुकसान होते, मनःस्ताप होतो, मानहानी होते हे योग्य नव्हे. माझ्यावर थोडा विश्वास ठेवायला शिका.
तुम्हाला दिसतात माझे अपटुडेट कपडे, भव्य -सुसज्ज हॉस्पिटल आणि चकचकीत चारचाकी. पण हे सर्व मिळविण्यासाठी मी माझं अर्ध आयुष्य खर्ची घातलेलं असतं, डोळ्यांचे दिवे करून अभ्यास केलेला असतो. माझ्या आईवडिलांनी काबाडकष्ट करून, प्रसंगी घर-शेत विकून पैसा उभा केलेला असतो. डॉक्टर बनल्यावर माझ्यासाठी खस्ता खाल्लेल्या सर्वांची स्वप्ने मला पूर्ण करायची असतात.
आमच्या कुटुंबियांच्याही आमच्याकडून कांही अपेक्षा असतात. त्यांना आम्ही पुरेसा वेळ देऊ शकत नाही. नोकरी करणारे बंधू भगिनी घड्याळात पावणेसहा वाजले की घरी परतायला मोकळे होतात. आम्हाला नाही असं करून चालत. चोवीस तास सज्ज रहावं लागतं. पहाटेच्या साखरझोपेतून उठून इमर्जन्सी पेशंटवर उपचार करावे लागतात. कांही वेळा दुपारी तीन वाजेपर्यंत जेवायलाही वेळ नसतो. रात्री बारा वाजताही निवांतपणे झोपता येत नाही. एखादा सिरियस पेशंट येतो आणि पेशंटसह सर्व नातेवाईकांची इच्छा असते की आमच्या पेशंटवर आज, आत्ता, ताबडतोब उपचार झालेच पाहिजेत. अशावेळी डॉक्टरांचीही एखादी अडचण अडचण असू शकते हे त्यांना लक्षातच येत नाही. याबद्दलचा माझ्या मित्राच्या बाबतीत घडलेला एक किस्सा सांगावासा वाटतो, तो असा......
एक सिरियस पेशंट त्याच्या दवाखान्यात आलेला असतो. हॉस्पिटल मधील असिस्टंट डॉक्टरांनी प्राथमिक उपचार सुरु केलेले असतात. पेशंटला धाप लागलेली असते. नातेवाईक घाबरलेले असतात. मुख्य डॉक्टर अजून का आले नाहीत म्हणून नातेवाईकांचा दंगा सुरु असतो. पंधरा मिनिटांत डॉक्टर येतात. त्यांच्या गाडीला गराडा घालून नातेवाईक त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार चालू करतात. त्या सर्वांना बाजूला सारत डॉक्टर आत जातात. पेशंटला तपासून उपचार सुरू करतात. अर्ध्या तासानंतर पेशंटची धाप कमी होते. डॉक्टर बाहेर येऊन नातेवाईकांना सांगतात, तुमच्या पेशंटला आराम पडला आहे.
मघाशी तुम्ही सगळे फारच रागात होता म्हणून मी कांहीच बोललो नाही. मला यायला पंधरा मिनिटे उशीर झाला कारण माझा एकुलता एक चिरंजीव सहलीला गेला होता, त्यांच्या स्कूल बसचा अक्सिडेंट झाला. त्याच्या पायाला फार लागलय असा फोन आल्यामुळे मला तिकडे जावे लागले. त्याला त्याच ठिकाणी ताबडतोब उपचार होणे आवश्यक होते. त्याला अँडमिट् करून तुमचा फोन आल्यावर लगेच तेथून निघालो त्यामुळे पंधरा मिनिटे उशीर झाला. आत्ताच त्याच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांचा फोन येऊन गेला माझ्या मुलाच्या पायाला सतरा टाके पडलेत. हे ऐकून नातेवाईकांना आपल्या कृत्त्याची लाज वाटली. त्यांनी डॉक्टरांची हात जोडून माफी मागितली.
असे प्रसंग माझ्या जीवनात वारंवार येतात. मलाही माझं खाजगी जीवन आहे. मलाही मुलांबाळासोबत, पत्नीसोबत वेळ घालवायला आवडते पण कित्येक वेळा माझा नाईलाज होतो. मुलांच्या, बायकोच्या वाढदिवसाच्या दिवशीच इमर्जन्सी केस येते. घरी गेल्यावर रूसव्यावर ईलाज करावा लागतो.
आत्ता कोरोनाच्या काळातच बघा ना, सख्खे नातेवाईक बाधितांच्या जवळ यायला तयार नाहीत. प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो, लाखमोलाचा असतो हे खरे आहे. डॉक्टरानाही त्यांचा जीव प्यारा असतो. त्यानाही त्यांच्या कुटूंबाची काळजी वाटते पण आम्ही भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ समजून, आपण पत्करलेल्या कामाशी एकनिष्ठ राहून कर्तव्य पार पाडतो. आम्ही सर्वांनी आमच्या स्टाफच्या मदतीने लाखो रूग्णांवर उपचार केले. उपचारादरम्यान माझ्या कित्येक मित्रांना बाधित व्हावे लागले पण त्यांनी आपल्या जिवाची पर्वा केली नाही. परिवाराच्या सुरक्षिततेसाठी कित्येक दिवस आम्ही दूर राहिलो. आमच्या भगिनींनी आपल्या चिमुकल्याना इतरांच्या हवाली करून पेशंटांची सेवा केली. नातेवाईक प्रेत ताब्यात घ्यायला ही तयार नव्हते. अशावेळी आमच्या कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार सुद्धा पार पाडले.
समाजाने याची जाणीव ठेवायला हवी. डॉक्टरांच्यावर विश्वास ठेवायला हवा. सांगितलेली पथ्ये पाळून सहकार्य करायला हवे.
शेवटी एवढेच सांगतो ...
डॉक्टर खुदा नही
डॉक्टर दवा देता है।
दुवा खुदासे मांगो।
जिंदगी खुशी से जिओ।
काय गप्पा मारत बसलोय, पेशंट वाट पहात बसले असतील. निघतो बाय बाय...