रमजान संदेश लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रमजान संदेश लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १६ एप्रिल, २०२१

जकात न देणारे श्रीमंत: हजरत निजामुद्दीन औलिया - विशेष लेख


जकात न देणारे श्रीमंत: हजरत निजामुद्दीन औलिया

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       दिल्लीचा बादशहा मुहम्मद बिन तुघलक यांच्या कारकिर्दीत हजरत निजामुद्दीन औलिया होऊन गेले. हजरत निजामुद्दीन पाच दिवस सोडून वर्षभर उपवास (रोजे) करायचे. त्यांनी जकात कधीच दिली नाही. याचा अर्थ असा नाही, की त्यांच्याकडे धनसंपत्ती नव्हती. त्यांनी सात अत्यंत प्रभावशाली बादशहांचा कार्यकाळ आपल्या डोळ्यांनी पाहिला. हे बादशहा त्यांच्या सेवेत आणि लंगरादीकरिता सोन्या-चांदीचे तोडे आणि सोन्याची तबकडी भरून मोठे मोठे खरे मोती पाठवायचे तरीसुध्दा त्यांच्यावर जकात देणे शरीअतप्रमाणे लागू नाही कारण त्या मालावर एक वर्ष ओलांडावे लागते, ज्याला इस्लामी कायद्यात "होलाने हौल' म्हणतात. मिळालेली संपत्ती एक रात्रही ते आपल्या जवळ ठेवत नसत. सकाळी माल आला की संध्याकाळच्या मैफिलीत ते त्याची विल्हेवाट लावून टाकायचे. चीजवस्तूंची लहान-लहान पोतडी करून गरजूंच्या घरी पोचती करायचे आणि या कामी त्यांचा सेवकवर्ग नेहमी सज्ज असायचा. प्रवासात असताना त्यांचे अनुयायी, भाविक त्यांचा तंबू सोन्याच्या मेखानी रोवायचे आणि त्यांना याची कल्पनासुध्दा नसायची. सिध्द हस्ते केलेला दानधर्म मालाची टंचाई कधीच भासू देत नाही


आजही हजरत निजामुद्दीनच्या दर्ग्यावर दररोज हजारोंच्या संख्येने हिंदू, मुस्लिम, शीख, बौध्द इ. भाविकांची गर्दी असते.


गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

जकात: एक आर्थिक उपासना - विशेष लेख


जकात: एक आर्थिक उपासना - विशेष लेख

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       इस्लामच्या पाच प्रार्थना पध्दती आहेत. १) ईमान २) सलात (नमाज पढणे), ३) उपवास (रोजा), ४) जकात, ५) हज या पाचपैकी एकाचाही इन्कार मुस्लिम बांधवाना करता येत नाही. रमजानच्या पवित्र महिन्यात सर्व मुस्लिम बांधव एक आर्थिक उपासना करतात आणि ती आहे 'जकात' देण्याची. जकात हे एक प्रकारचे दान आहे. जे आपल्या मालमत्तेवर वर्षातून एकदा हिशेब करून देणे गरजेचे आहे.


       जकात 'साहिबे निसाब' म्हणजे दारिद्र्य रेषेच्या वरची श्रीमंत माणसे देतात. आजपासून सुमारे साडेचौदाशे वर्षापुर्वी ही दारिद्र्यरेषा ठरविण्यात आली आहे. ज्या व्यक्तीपाशी ८७.४७९ ग्रॅम इतके सोने अथवा ६१२.३५ ग्रॅम इतकी चांदी किंवा या किंमतीचा विकाऊ माल किंवा नाणी, नोटा, एफ. डी., शेअर सर्टिफिकेट, कंपन्यामध्ये इतर गुंतवणूक आहे त्या रकमेवर जकात आहे. ही जकात एकूण मालाचा चाळीसावा भाग म्हणजे अडीच टक्के वजा करून गोरगरीबांमध्ये वाटून टाकावी.


       मालावर एक संपूर्ण वर्षाचा कालावधी ओलांडला गेला पाहिजे. जकात जवळच्या नातेवाईकांना प्राधान्याने देण्यात येते. आईवडील आपल्या मुलामुलींना तसेच मुले आपल्या मातापित्यांना जकात देवू शकत नाहीत, तसेच आजी आजोबा व मुलामुलींच्या संतानाला देखील जकात देवू शकत नाहीत. पत्नी पतीला जकात देऊ शकते, कारण त्याच्या खर्चाची जबाबदारी पत्नीवर नाही. 


       इस्लामी शरीअतमध्ये जकात देण्याचे फार महत्व आहे.


बुधवार, १४ एप्रिल, २०२१

रमजानचा महिमा - विशेष लेख


रमजानचा महिमा - विशेष लेख

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       रमजान महिना सुरू झाला की, अल्लाहच्या नामस्मरणात दिवस कसे निघून जातात हे कळत देखील नाही. रोजांमुळे दिवसभर पोटाला विश्रांती मिळते. त्यामुळे शरीराच्या विकासशक्तीमध्ये सुधारणा होते. पचनसंस्थेला पूर्ण विश्रांती मिळाल्यामुळे प्राणशक्ती, श्रवणशक्ती व स्मरणशक्तीमध्ये सुधारणा होऊन आत्मिक सामर्थ्य प्राप्त होते. 'रोजा' मुळे वाईट कृत्या पासून बचाव व अल्लाहचे भय बाळगण्याचा गुण व्यक्तिमध्ये निर्माण होतो.


       एखाद्या व्यक्तिचा रोजा (उपवास) सुरू असेल तर त्याने वाईट कृत्यापासून लांब रहावे. या काळात उपवास करणाऱ्याला कोणी अपशब्द वापरले तर नम्रपणे त्याला सांगावे की, "मी 'रोजा' मध्ये आहे, तुझ्याशी भांडण करणार नाही पण माझ्या बांधवा कृपा करून पुन्हा मला असे बोलू नकोस". रोजामुळे व्यक्तीला दीन दुबळ्यांच्या तहान-भुकेची कल्पना येते. रोजा स्वत:साठी नाही तर दुसऱ्यासाठी जगण्यास शिकवतो.


       रमजान म्हणजे उपासना, कृतज्ञता, आनंद व आभार प्रदर्शनाचा महिना मानला जातो. 'इस्लाम' या शब्दाचा अर्थ शांती, शुध्दता, समर्पण व आज्ञापालन असा आहे. 'इस्लाम' म्हणजे मानवाचे ईश्वराला आत्मसमर्पण व ईश्वराचे आज्ञापालन होय.


मंगळवार, १३ एप्रिल, २०२१

रमजान: आत्मिक शुध्दीचा महिना - विशेष लेख


उद्या दिनांक १४ एप्रिल २०२१ पासून रमजानचा पवित्र महिना सुरू होत आहे, त्यानिमित्ताने विशेष लेख मालिका आजपासून सुरु करत आहे.


रमजान: आत्मिक शुध्दीचा महिना - विशेष लेख

✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी


फोटो साभार: गूगल


       'रोजा' इस्लामच्या पाच आवश्यक उपासनापैकी एक आहे. रोजे रमजानचा चाँद दिसल्यापासून सुरू होतात.


       रोजे (उपवास) करणे याचा अर्थ केवळ उपाशी-तापाशी राहणे नाही. मानवाच्या मनामध्ये चांगल्या भावना जागविण्याची प्रेरणा देणारी ही प्रक्रिया आहे. रमजान हा आत्मशुध्दी करणारा महिना आहे. रमजान पवित्र प्रार्थना करण्याचा, मनापासून अल्लाहची उपासना करण्याचा महिना आहे. 'रोजे' म्हणजे इंद्रियाना वश करण्याचा तप आहे. या काळामध्ये वाईट गोष्टीकडे जाणे, वाईट गोष्टी करणे तर दूरच, त्यांच्याबाबत विचार करणे हा सुध्दा गुन्हा आहे. दुसऱ्याबद्दल वाईट विचार करणे, खोटे अथवा दुसऱ्याला त्रास होईल असे बोलणे निषिध्द मानले जाते. थोडक्यात रोजे (उपवास) केल्यानंतर वाईट पाहू नये, वाईट ऐकू नये व वाईट बोलू नये. रोजे राहणाऱ्याने मन, वचन आणि कर्माने स्वत:ला शिस्तबध्द आणि संयमित ठेवावे लागते.


       पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत फक्त आपल्या दीन अर्थात् अल्लाहच्या स्मरणात मग्न राहून आत्मिक शांती मिळविण्याची ही नामी संधी आहे. अल्लाह सर्वांना 'रोजे' करण्याची आणि उपासना करण्याची सुबुद्धी देवो...!