मायेचा पाझर
छोटी यास्मिन मम्मीसह
स्वतःचे घरदार, गांव सोडून जयसिंगपूरमध्ये नोकरीसाठी आलेले आम्ही सर्व शिक्षक एका आदर्श कुटूंबाप्रमाणे राहतो. यापुढेही राहू. आमच्यापैकी कुणाच्याही घरी आनंदाचा कार्यक्रम असला तर आम्ही सर्वजण आवर्जून हजर राहतोच पण दुःखाच्या प्रसंगीही हजर होतो. मग कुणाचे गांव कितीही लांब असो. आमचा हा गोतावळा भेटून गेली की दुःखाचा भार क्षणात हलका होऊन जातो. आनंदाच्या क्षणी ही सर्व मंडळी हजर झाली की आनंद द्विगुणित होतो.
१९८८ साली आमच्या ग्रुपमधील बरेच जण स्थिरस्थावर झाले होते. थोडीशी आर्थिक सुबत्ता आली होती. शिक्षक बँकेचे गृहकर्ज मिळत होते. त्यामुळे आम्ही सर्वांनी प्लॉट खरेदी करून घरे बांधण्याचा सपाटाच लावला होता. रिमझिम पावसाचा श्रावण महिना सुरू होता. आमच्या शाळेतील शिक्षक डिग्रजे सरांच्या घराची वास्तुःशांती होती आणि तो वर्किंग डे होता. सर्वांना आग्रहाचं निमंत्रण होतं. शाळा नं. १ मध्ये आम्ही तेवीस शिक्षक कार्यरत होतो. त्यापैकी ९ शिक्षिका होत्या. सर्वानुमते ठरले की लेडिजनी मधल्या सुट्टीत भोजनासाठी जायचे व आम्ही परत आल्यावर सर्व जेन्ट्स नी जायचे. त्या मुदतीत आम्ही शाळा सांभाळायची. त्यावेळी माझी कन्या यास्मीन चार महिन्याची होती. मधल्या सुट्टीत मी तिला दुग्धपान देण्यासाठी रामनगरमध्ये घरी जात होते. ४० मिनिटांची सुट्टी असायची. त्यातील २०-२५ मिनिटे येण्याजाण्यात खर्च व्हायची. १५ मिनिटातच तिचे पिणे व माझे खाणे आवरावे लागायचे. त्यादिवशी सगळ्याजणी वास्तु शांतीसाठी निघाल्यावर मी त्यांना म्हणाले, 'तुम्ही जावून या सगळ्या मी संध्याकाळी जाईन'. माझी मैत्रिण लता हंकारे म्हणाल्या, 'चला आमच्याबरोबर नंतर कुठं जाता एकट्या परत येताना तुम्ही १० मिनिटे थांबून या हवं तर आम्ही सर्वजण पुढे येतो'. मी त्यांच्याबरोबर भोजनासाठी गेले. आम्ही तिथे पोहचण्यापूर्वीच नुकतीच पंगत बसली होती. त्यामुळे आम्हाला पंगत उठेपर्यंत थांबावे लागले. आमचं भोजन सुरू असतानाच शाळेकडून निरोप आला की, शाळेत आकस्मित तपासणी पथकाचे प्रमुख अधिकारी पाटणकरसाहेब शाळेत आलेले आहेत तुम्ही ताबडतोब शाळेत या.
त्यावेळी आकस्मित तपासणी पथकाला जागेवर सस्पेंड करण्याचे अधिकार देण्यात आले होते. नावाप्रमाणेच हे पथक आकस्मितपणे शाळेत यायचे. पाटणकर साहेब खूप कडक असल्याचे ऐकिवात होते. या पथकाने शिक्षकांवर कारवाई केल्याचेही ऐकले होते. त्यामुळे आम्ही सगळ्याजणी खूप घाबरलो. आमच्या लीडर मुरगुंडे मॅडम यांनी एक टेम्पो थांबवला व आम्ही ताबडतोब शाळेत गेलो. इकडे माझी छकुली माझी वाट पाहून थकली होती. तिने जोर जोरात रडायला सुरूवात केली होती. त्यावेळी फोनचीही सोय नव्हती. माझ्या सासूबाई तिला वरचे दूध पाजण्याचा प्रयत्न करत होत्या पण ती एक घोटही घ्यायला तयार नव्हती. आमच्या शेजारी रहाणाऱ्या काकू आज कामाला गेल्या नव्हत्या. बाळाचं रडणं ऐकून त्या बाहेर आल्या. त्या म्हणाल्या, 'आजी का रडतय बाळ एवढं' सासूबाई म्हणाल्या, 'बाळाची आई आज का आली नाही कुणास ठाऊक'. काकू म्हणाल्या, 'मॅडमचं काहीतरी काम निघालं असेल मी घेऊन जाते बाळाला शाळेकडे'.
ऑफिसच्या शेजारीच माझा पाचवीचा वर्ग होता. मराठीचा तास होता. टाचण वही उघडून पाहिलं तर त्यात दया पवार या लेखकांचा मायेचा पाझर या धड्यावरील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करून घेणे हा घटक मी नोंद केलेला होता. धडा यापुर्वी शिकवून झाला होता. वाक्यप्रचार फळ्यावर लिहिले. मायेचा पाझर फुटणे, डोळे भरून येणे, कालवाकालव होणे, भांबावून जाणे, कीव येणे इ. धडा शिकवत असताना वाक्यप्रचारांचा अर्थ सांगितलेला होता. त्यामुळे आता फक्त वाक्यात उपयोग करून घ्यायचा होता. साहेब सर्वप्रथम माझ्याच वर्गात आले. मी विद्यार्थ्यांना विचारले, मायेचा पाझर फुटणे या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करून कोण सांगेल ?
इकडे माझी यास्मीन जोरजोरात रडत होती. माझ्या बोलण्याचा आवाज ऐकून तिने टाहो फोडला होता. त्या काकी माझ्या आवाजाच्या दिशेने खिडकीजवळ आल्या. त्यांना मी खुणेनेच लांब जायला सांगितले. तेवढ्यात बाळाची नजर माझ्याकडे गेली असावी ती दुप्पट मोठ्याने रडत होती. एका विद्यार्थ्यांने वाक्य सांगितले, ' मला पाहून माझ्या आईला खूप माया येते'. आणि खरं सांगू वाचकहो बाळाचे रडणे ऐकून मला ' खराखुरा मायेचा पाझर फुटला होता व तो आवरणे कठीण झाले होते. दुधाचे थेंब खाली पडत होते. विद्यार्थ्यांने अर्थाचा वाक्यात उपयोग केलाय हे माझ्या लक्षातही आले नाही. पुरती गोंधळुन गेले होते मी. साहेब मोठ्यानं मला म्हणाले, 'मॅडम विद्यार्थ्यांने अर्थाचा वाक्यात उपयोग केला. त्याला वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा अशी सुचना न देता त्याचं उत्तर स्विकारलं हे बरोबर नाही असे म्हणत अध्यापन कसं परफेक्ट असावं या विषयी त्यांनी लेक्चर द्यायला सुरूवात केली. मी त्याचं बोलणं ऐकत असल्याचं त्यांना भासवत होते पण माझं लक्ष होतं माझ्या रडणाऱ्या बाळाकडं, साहेब कधी एकदा दुसऱ्या वर्गात जातात असं वाटत होतं. पण साहेबांनी विद्यार्थ्यांच्या गृहपाठाच्या वह्या तपासायला सुरूवात केली. गृहपाठ तपासून चुका दाखविल्या होत्या, चुकीचे शब्द ५-५ वेळा लिहूनही घेतले होते. पण त्या शब्दाखाली सही केली नव्हती. त्याविषयी सूचना देऊन, अधिक लक्षपूर्वक अध्यापन करण्याचा सल्ला देवून साहेब दुसऱ्या वर्गात गेले एकदाचे !
वयाच्या मानाने अधिक पोक्तपणा व समज आलेली सुनिता घाळी नावाची विद्यार्थीनी मला म्हणाली, 'मॅडम बाळ किती रडलं घ्यायचं नाही होय त्याला. 'व ती काकूना बोलवण्यास बाहेर गेली. विद्यार्थ्यांनाही माझी ही अवस्था समजली असावी. ते शांतपणे फळ्यावरील वाक्यप्रचार लिहून घेवून वाक्यात उपयोग करून लिहू लागले. साहेबांना परत येताना दिसणार नाही अशा कोपऱ्यात बसून बाळाला शांत केले. बाळ शांत होऊन खुदकन् हसले. आज इतक्या वर्षानंतरही तो प्रसंग आठवला की डोळ्यात अश्रूची गर्दी होते. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ हे मान्य असूनही कर्तव्य पार पाडताना कशी अवस्था होते याची प्रचिती मला आली.
मिळवत्या स्त्रीकडे पाहताना सर्वांना तिचा पगार दिसतो, तिचं ठीकठाक राहणीमान दिसतं, आर्थिक संपन्नताही नजरेत भरते पण आपल्या काळजाच्या तुकड्याला घरी सोडून ड्युटीवर जाताना तिला किती यातना होतात हे सहसा कुणालाच दिसत नाही. 'घार फिरते आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी' अशी तिची अवस्था होते. पाण्यात अश्रू ढाळणाऱ्या माशाप्रमाणे तिचे अश्रू कुणाला दिसत नाहीत. अश्रू पुसणारे कुणीच नसते. त्यामुळे रडण्यातही मजा नसते. म्हणून येणारा प्रत्येक दिवस ती पार पाडत असते.
हीच यास्मिन माझ्या आजारपणात माझी आई बनली.
