लघुकथा संग्रह क्र. ११ ( विधायक - अलक )
लघुकथा क्र. ५१ - पुत्र व्हावा ऐसा
माझा सर्दीमुळे आवाज बसला होता. एकत्र जेवताना मी सूनबाई हिनाला म्हटलं, "मला आज थोडीशीच भाजी आणि वरण वाढ. माझं तोंड आलय, तिखट लागू देईना". संध्याकाळी चिरंजीव मोहसीन ऑफिसमधून येतानाच कंठवटी गोळ्या, कफलेट, व तोंड आल्यावर लावायची ट्यूब घेऊन आला तेही न सांगता! ते पाहून माझा बसलेला आवाज खाड्कन उठून ऊभा राहिला आणि आलेलं तोंड मागे न बघता पळून गेलं.
लघुकथा क्र. ५२ - निर्णय त्यागाचा
सुदर्शन इंजिनिअर होऊन अमेरिकेत सर्व्हिसला होता. दोन तीन वर्षानंतर त्याची पत्नी श्वेता व छोट्या स्वराला अमेरिकेत नेण्याचा योग आला. पासपोर्ट, व्हिसा तयार झाला. सुदर्शन श्वेता हरखून जाण्याची जय्यत तयारी करत होते. परदेशात संसार थाटण्याची सोनेरी स्वप्ने पहात होते. आता फक्त आठच दिवस उरले होते. एवढ्यात सुदर्शनच्या आईला कँन्सर झाल्याचे निदान झाले. वेळ न दवडता सुदर्शनने आईचं ऑपरेशन करुन घेतलं व श्वेता व स्वराला सोबत न घेताच आईच्या सेवेला ठेवून, वडिलांना आधाराचे बळ देऊन निघून गेला. सुनेच्या सेवा सामर्थ्याने आई लवकरच खडखडीत बरी झाली.
लघुकथा क्र. ५३ - मोठेपणा मनाचा
धीरज व सूरज दोघे भाऊ. वडील BSNL मध्ये नोकरीत होते. सेवेत असतानाच त्यांचे हार्ट अटॅकने निधन झाले. धीरजने नुकतीच बी. ई. सिव्हिलची पदवी घेतली होती तर सूरज बी.कॉम च्या शेवटच्या वर्षात शिकत होता. वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर एकाला नोकरी मिळणार होती. धीरज म्हणाला, "मला कुठेही नोकरी मिळू शकते, सूरजला मिळणे अवघड आहे, त्यालाच या संधीचा फायदा घेवू द्या. पुढे घरांच्या वाटणीची वेळ आली. एक जुना बंगला होता व एक मोठी एरिया असलेला नवा बंगला होता. सूरज म्हणाला, "जुना बंगला मला व नवा बंगला दादाला". नोकरीच्या वेळी मनाचा मोठेपणा दादाने दाखविला आता बारी माझी मनाचा मोठेपणा दाखविण्याची !
लघुकथा क्र. - ५४ वेगळा संसार नको मला !
रिध्दी सिध्दी दोघी जुळ्या बहिणी. रिध्दीचं लग्न ठरलं. तिच्या लग्नासोबतच सिध्दीचंही लग्न उरकून घेण्याचा आईवडिलांचा विचार होता. तिच्यासाठी एक स्थळ आले. मुलगा इंजिनिअर होता. बेंगलोरला मोठ्या कंपनीत सर्व्हिसला होता. आईवडील, भाऊबहिणी व इतर कुटूंबिय गांवी रहात होते. सर्वांना स्थळ पसंत पडलं कारण सिध्दीला बेंगलोरला राजाराणीचा संसार थाटायला मिळणार म्हणून. एवढ्यात सिध्दी म्हणाली, "मला हे स्थळ पसंत नाही. मला एकत्र कुटूंबात रहायचं आहे. फक्त राजाराणीचा संसार मला नको आहे".
लघुकथा क्र. ५५ - अनोखे आजीप्रेम
रौनकला टायफाईड झाल्याने हॉस्पिटलमध्ये ऎडमिट होता. दुर्दैवाने त्याच्या आजीलाही दुसऱ्या दिवशी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ऐडमिट करावे लागले. रौनकला ते समजताच तो त्यांच्या डॉक्टरना म्हणाला, "डॉक्टर माझ्या हाताचे सलाईन लवकर काढा. मला माझ्या आजीला भेटायला जायचे आहे लगेच". आजीला हे समजताच नातवाच्या प्रेमाने भरून पावली. नातवाच्या मायेचे टाॅनिक मिळताच लवकरच बरी होऊन घरी आली.
अशा या विधायक, सकारात्मक कथा समाजापुढे मांडून सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणयाचा माझा प्रामाणिक प्रयत्न !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा