शनिवार, २६ जुलै, २०२५

पुस्तक परीक्षण आठवण ( कथा संग्रह )

                 ✍️:डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी


पुस्तक परीक्षण
आठवण ( कथा संग्रह )

लेखक- श्री.आबासाहेब सूर्यवंशी

            निवृत्त शिक्षणाधिकारी

प्रकाशक - सुनंदा प्रकाशन , 

                     जयसिंगपूर

पृष्ठे - ९५

मूल्य - १५० रूपये

प्रथमावृत्ती - ३० मार्च २०२५


      लेखक श्री. आबासाहेब सूर्यवंशी यांचा ' आठवण ' हा कथासंग्रह नुकताच वाचनात आला. या कथासंग्रहामध्ये वीस कथांचा समावेश आहे. हे पुस्तक न थांबता एकाच दिवसात वाचले. माझे पती मन्सूर तांबोळी  यांना वाचनाची विशेष आवड नाही. पण त्यांनीही पुस्तक वाचायला घेतल्यावर एकाच दिवसात वाचले. हेच या पुस्तकाचे यश आहे असे मला वाटते. छोटेखानी कथानक , अनुरूप भाषाशैली , मजेशीर प्रसंग , जिज्ञासा वाढविणारी लेखन शैली या सर्व वैशिष्ट्यपूर्ण बाबींनी नटलेल्या कथा वाचतांना अजिबात कंटाळा येत नाही.

    

        या कथासंग्रहातील अस्सल नक्कल , लिफ्ट , लोकप्रतिनिधी , स्पर्धेतील आजोबा , एक एप्रिल , योगायोग , आमचा जीवघेणा प्रवास , एक होता मोहम्मद रफी , राग उथळ प्रेम निथळ , तर आज मी नसतोच , नवरदेवाचा बूट , शिक्षण आणि संस्कार या बारा कथा लेखकांच्या जीवनातील जिवंत अनुभव आहेत. त्यामुळे या कथा वास्तव वाटतात. प्रसंग प्रत्यक्ष पहात आहोत असे वाचतांना वाटते. प्रत्येक कथा  वाचकांना कांही संदेश देवून जातात. या कथा आवडण्याचे दुसरे कारण कथा प्रसंगानुरूप चित्रांमुळे अधिक बोलक्या झाल्या आहेत.


        अस्सल नक्कल कथेमध्ये जातिवंत कलाकार भेटतो , जो अधिकाऱ्यानाही क्षणभर फसवतो. लिफ्ट कथेमधून लिफ्ट देतांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला मिळतो. स्पर्धतील आजोबा मधून नातवंडे म्हणजे आयुष्याचा बोनस असतो , त्यांच्यासाठी आजी आजोबा कांहीही करु शकतात हे समजते. एक एप्रिल या कथेतून एकाद्याची गंमत दुसऱ्याला प्रचंड मानसिक त्रास देऊ शकते हे कळते. आमचा जीवघेणा प्रवास  जगात अजूनही चांगल्या व्यक्ती आहेत याची जाणीव करून देते.

    

      मला सर्वात जास्त आवडलेली कथा आहे ' राग उथळ प्रेम निथळ ' लाख मोलाची सद्या दुर्मिळ झालेली एकत्र कुटूंबपद्धती या कथेत लेखकांनी खुबीने मांडली आहे. पत्नीला मारझोड करणे हा पुरूषांचा जन्मसिद्ध हक्क मानला जात होता ही वास्तविकता लेखकांनी हुबेहूब मांडली आहे. कथेचा शेवटही गोड केला आहे. शिक्षण आणि संस्कार मध्ये शिक्षणाधिकारी या नात्याने शिक्षण व संस्काराचे महत्त्व पटवून दिले आहे. शिक्षणातील गाभाभूत घटकांचे विवेचन केले आहे.

    

     हाँटेल सलून ही विनोदी कथा छान मनोरंजन करते. भूस्खलन ही कथा नैसर्गिक आपत्तीची भयानकता दाखवते. ह्रदय पिळवटून टाकते.

       

      सद्याचे जग हे धावते जग आहे. कुणालाच सद्या वेळ नाही. क्रिकेटवेड्या लोकांनाही हल्ली पाच दिवसाची कसोटी आवडत नाही , ट्वेंटी ट्वेंटी आवडते. हे ओळखून लेखकांनी थोडक्यात पण आशयपूर्ण कथा लिहिल्या आहेत.


      लेखकानी कांही सुंदर वाक्यांची सुरेख पेरणी केली आहे. ती अशी स्पर्धेतील आजोबा या कथेत ते म्हणतात ' माझ्यापेक्षा सहा वर्षांनी लहान असणारी माझी तरुण वृद्ध  पत्नी , सत्तरीतला मी .' आमचा जीवघेणा प्रवास या कथेत ते म्हणतात ' नवऱ्याच्या भरघाव गाडीला बायकोचा अर्जंट ब्रेक ' अशी म्हण संसारात आणि प्रवासातही महत्त्वाची हे मला पटून चुकले.


     एक होता मोहम्मद रफी या कथेत ते म्हणतात ' परमेश्वर कोणाला कांही देताना जातधर्म पहात नाही. प्रत्येक माणसाजवळ असे काहीतरी असतेच असते. फक्त आपण ते ओळखणे गरजेचे आहे.'


      थोडक्यात उत्कृष्ट बांधणीचे , सुंदर मुखपृष्ठ असलेले , रेखीव मुद्रण व आशयपूर्ण कथा असलेले हे पुस्तक वाचकांना निश्चित आवडेल अशी मला आशा वाटते.

लेखकांना पढील लेखनकार्यास हार्दिक शुभेच्छा ।