मॅट्रिकचे म्हणजे जुन्या अकरावीचे वर्ष जीवनाला वेगळे वळण देणारे वर्ष. जीवनातील एक टर्निंग पॉईंट ठरणाऱ्या सन १९७३-७४ या शैक्षणिक वर्षात मी कन्या विद्या मंदिर, दुधगांव येथे शिक्षण घेत होते. आमच्या माळवाडीपासून हायस्कूलपर्यंतचे अंतर चार किलोमीटर आहे. पावसाळ्यात चिखलाने व उन्हाळ्यात-हिवाळ्यात धुळीने काठोकाठ भरलेला कच्चा रस्ता तुडवीत पायीच जावे लागायचे तेही अनवाणी. रस्त्यांची ही दशा असल्यामुळे बसची सोय नव्हती आणि सोय असती तरी त्यावेळी आर्थिक परिस्थितीमुळे परवडणारी नव्हती.
भाऊसाहेब कुदळे विद्यालयातून विभक्त होऊन स्वतंत्र कन्या विद्या मंदीर स्थापन झाल्यावर पहिली बॅच आमची होती. त्यामुळे निकाल १००% लावण्यासाठी शिक्षकांचे आटोकाट प्रयत्न सुरु होते. सकाळी आठ ते दहा या वेळेत अभ्यासिका सुरू होती. मला अभ्यासिकेत जाणे शक्य नव्हते कारण एवढ्या लवकर स्वयंपाकासाठी सामग्री उपलब्ध नसायची. घरच्या जिराईत शेतातील धान्य पहिले सहा महिनेच पुरायचे. त्यात मागच्याच वर्षांत दुष्काळ येऊन गेलेला. सकाळी उठून माळवाडीपासून दीड किलोमीटर वर असलेल्या सावळवाडी या गांवातून धान्य दळून आणावे लागायचे. सावळवाडीत जाऊन रेशनच्या रांगेत उभे राहून धान्य घ्यावे लागायचे, त्यानंतर माझी मोठी मावसबहीण जिल्याबू सावळडीत रहायची तिच्या घरी जाऊन धान्य निवडावे लागायचे व मग पिठाच्या गिरणीत दळण्यासाठी जायचे. तिथेही खूप गर्दी असायची. हे सर्व सोपस्कार आवरून डोक्यावर दळणाची बुट्टी घेऊन परतत असताना वाटेत मैत्रिणी हायस्कूलला निघालेल्या असताना भेटायच्या. "आज शाळेला येणार नाहीस का?" हे मैत्रिणींचे शब्द काळजात बाणाप्रमाणे शिरायचे. तिकडे दुर्लक्ष करून मी घर गाठत होते. पीठ आल्याबरोबर आजी, आई किंवा बहीण ताबडतोब भाकरी करायच्या. मग जेवण करुन आमची स्वारी शाळेला निघायची. घड्याळात किती वाजले बघायचा प्रश्नच नव्हता कारण आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे घड्याळ नव्हते. मी वर्गात पोहोचायची. कम् इन् म्हटल्यावर वर्गात जाऊन शेवटच्या बेंचवर बसायची. मैत्रिणीला हळूच विचारायची "अगं आज पहिला तास मराठीचा होता ना मग आता सायन्सचा तास कसा सुरू आहे?" मैत्रिण म्हणायची "अगं हा दुसरा तास सुरू आहे खुळे". मग डोक्यात लख्ख प्रकाश पडायचा.
मी हे काम करत असताना माझ्या भावंडांना अनेक कामं असायची. विहिरीतून रहाटाने ओढून पाणी भरावे लागायचे, शेतातून वैरण आणावी लागायची, आईवडिलांना शेतीच्या कामात मदत करायला जावे लागायचे. आमची परिस्थिती लक्षात घेऊन सर्व शिक्षकांनी मला अभ्यासिकेत हजर राहण्याची सक्ती केली नाही. मुख्याध्यापिका पवार मॅडम्, मिसाळ मॅडम्, लहुटे मॅडम्, जाधव सर, आमणे सर या सर्वांनी आपल्याजवळचे गाईडस्, प्रश्नसंच मला परीक्षेच्या आधी कांही दिवस दिले होते. वर्ग अध्यापनाच्या वेळी सर्व शिक्षक माझ्याकडे विशेष लक्ष द्यायचे कारण त्यांच्या दृष्टीने मी त्यावेळी हुशार होते. वासरात लंगडी गाय शहाणी म्हणतात ना तसं झालं होतं.
जून ते जानेवारी अखेर मला अभ्यासिकेत जाणे जमले नव्हते. फेब्रुवारी मध्ये माझ्यावर अल्लाहची कृपाच झाली म्हणायची. नेमका त्याचवेळी रमजान महिना सुरु झाला. माझी आजी दादी महिनाभर रोजे करायची. मी विचारपूर्वक ठरवलं की यावर्षी आपणही महिनाभर रोजे करावेत म्हणजे दादीबरोबर पहाटे थोडेसे जेवण केले की सूर्यास्तापर्यंत जेवणाचा प्रश्नच येणार नाही. महिनाभर अभ्यासिकेत जाता येईल. आईच्या परवानगीने व भावंडाच्या संमतीने मी महिनाभर अभ्यासिकेत हजर राहू शकले. या कालावधीत खूप त्रास व्हायचा, अशक्तपणा जाणवायचा पण तिकडे दुर्लक्ष करून मी अगदी मनापासून अभ्यास केला. हायस्कूलमध्ये गेस्ट लेक्चर्स सुरू होते संध्याकाळी निघायला उशीर व्हायचा. रोजा सोडायची वेळ रस्त्यातच व्हायची. शेतात पाणी पाजण्यासाठी चेंबर सुरू असायचे. ओंजळभर पाणी पिऊन रोजा सोडायची.
अशा प्रकारे प्राप्त परिस्थितीशी टक्कर देत देत वर्ष संपत आलं. वार्षिक परीक्षेची चाहूल लागली. परीक्षेसाठी आष्टा या गांवी जावे लागायचे. खोली घेऊन आठ-दहा दिवस तेथे रहावे लागायचे. पाच-सात मैत्रिणींचा ग्रुप व्हायचा. आमचाही सहा मैत्रिणींचा ग्रुप तयार झाला. माझ्या मैत्रिणीची मंगल भोसलेची आत्या आष्टा येथे शिक्षिका होती. तिच्या ओळखीने तिच्या खोली जवळचीच एक मोठी खोली भाड्याने घेतली. आठ दिवसांसाठी काय काय साहित्य घ्यायचे याची लिस्ट मैत्रिणी करू लागल्या. बाकीच्या पाचही मैत्रिणी सधन होत्या. त्यांची लांबलचक लिस्ट पाहून मला धडकीच भरली. तसं पाहिलं तर मला अभ्यासाची काळजी कमी आणि कपड्यांची काळजीच जास्त होती. कारण माझ्याजवळ परगांवी नेण्यासारखी एकुलती एक 'ती लकी गुलाबी साडी' होती व एकच घरी वापरण्यासारखा परकर ब्लाउज होता. ऐनवेळी कपडे विकत घेऊन शिवायची ऐपत नव्हती. सोबत न्यायचा खाऊ, खोलीभाडे, जाण्यायेण्याचे गाडीभाडे, जेवणाचा डबा पोहचविणाऱ्या डबेवाल्याची फी, शिवाय किरकोळ खर्चासाठी कांही पैसे लागणार होते. एवढे सगळे पैसे आणायचे कुठून? हा प्रश्न माझ्या समोर आ वासून उभा होता. कपड्यांचं नांव काढणंही गैर होतं. त्यामुळे मी मनात विचार करत होते. माझी दोन नंबरची सख्खी मावसबहीण जैत्याबू आमच्या शेजारीच रहायची. इकडच्या नात्याने ती माझी चुलती होती. तिच्याकडे हिरव्या रंगाची, नाजूक सोनेरी काठाची एक नवीन छान साडी होती. हायस्कूलमध्ये निरोप समारंभाला गृप फोटोसाठी साडी नेसून यायचे ठरल्यावर, एका दिवसासाठी साडी नेसायला मागितल्यावर, तिने मला ती साडी दिली होती. आता परीक्षेसाठी मागितल्यावरही ती साडी देईल अशी आशा मनी बाळगून मी आईला कपड्यांच्या बाबतीत कांहीच बोलले नव्हते.
परीक्षेला जायचा दिवस उजाडला. दुपारी आष्ट्याला निघणार होतो. भैय्या त्यावेळी आष्टा येथे डी. एड्. चे शिक्षण घेत होता. घरातील एकुलती एक चांगली ट्रंक त्याच्याकडे होती. मला नेण्यासाठी ती ट्रंक घेऊन भैय्या सायकलने माळवाडीला आला. महत् प्रयासाने रवा, तूप, साखर यांची जुळणी करून रव्याचे लाडू बनवले होते. लाडूचा डबा ट्रंकेत ठेवला, पुस्तके-वह्या भरल्या व मी बहिणीकडे साडी मागून आणण्यासाठी गेले. साडी मागितल्यावर ती म्हणाली, "हे बघ ज्युबेदा, तू आठ दिवस तिकडे राहणार, माझी साडी पाक बोळा करून आणशील वापरून. पंधरा दिवसांनी माझ्या भाचीच लग्न आहे. मला त्या लग्नात नेसायला ही एकच साडी आहे चांगली दुसरी असती तर दिली असती तुला". दुखावलेलं मन आणि डबडबलेले डोळे घेऊन मी घरात आले. घरात येताच माझ्या अश्रूंचा बांध फुटला, मी हुंदके देत रडू लागले. आई माझ्यावर चिडली व म्हणाली, "पेपर लिहायला जातांना नेसायला एक साडी आहे, घरात घालायला परकर ब्लाउज आहे. साडी मळली तर संध्याकाळी धुवून टाकायची. एवढं रडायला काय झालं?" तिने मला समजवायचा प्रयत्न केला. पण माझं रडू थांबेना हे पाहून तिच्या रागाचा पारा चढला. रागाच्या भरात तिने माझ्या पाठीत चार दणके दिले ठेवून. मग काय रडण्याचा आवाज आणखी वाढला. नेमक्या त्याच वेळी माझे चुलत काका आब्बासचाचा घरी आले. त्यांनी आमचा संवाद ऐकला. जिब्बू रडू नकोस म्हणत ते पटकन घरी गेले. त्यांची पत्नी सांगलीत रहायची. त्यांची भावजय म्हणजे माझ्या न्यामतचाचीची तपकिरी रंगाची, निळ्या काठाच्या साडीची घडी घेऊन ते आले व म्हणाले ही साडी घेऊन जा रडू नकोस. मी डोळे पुसत उठले. रडून रडून डोळे सुजले होते पण मन मोकळे झाले होते. झाले मोकळे आकाश असे वाटत होते. माझ्या आईचा मार म्हणजे फुलांचा हार होता याचा प्रत्यय मी यापूर्वी बऱ्याच वेळा घेतला होता. त्यामुळे फुलांचा हार घालूनच मी मैत्रिणी समवेत आष्ट्यात हजर झाले.
मॅट्रिकच्या परीक्षेला जातानाचा तो प्रसंग आजही आठवला तर डोळे भरून येतात. त्या प्रसंगात दोष कुणाचाच नव्हता, दोष होता परिस्थितीचा! जैत्याबूकडे नवी एकच साडी होती, तिचे बोलणे त्यावेळी योग्यच होते. आईचे रागावणे क्रमप्राप्त होते. माझे रडणेही स्वाभाविक होते. आज मला कौतुक वाटते आब्बासचाचाचे व त्यांच्या विनंतीला मान देऊन आढेवेढे न घेता साडी देणाऱ्या माझ्या लाडक्या न्यामतचाचीचे, कारण न्यामतचाचीला माझे खूप कौतुक वाटायचे व मला तिच्याबद्दल जिव्हाळा. माझ्या त्या लकी गुलाबी साडीमुळे सात दिवस मैत्रिणींच्या नवनव्या साड्या नेसायला मिळाल्या हा भाग वेगळा. थँक्यू आब्बासचाचा व न्यामतचाची.
मी १९७४ साली अकरावी मॅट्रिकची परीक्षा फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण झाले. पाच विषयात डिस्टिंक्शन मिळाले. कन्या विद्या मंदिर, दुधगांव या विद्यालयात 'प्रथम' क्रमांक आला. खूप कौतुक वाटलं सर्व शिक्षकांना व माझ्या कुटूंबियाना, कौतुकाच्या वर्षावाने मी भिजून चिंब झाले. शाळेच्या बोर्डवर माझे नांव झळकले. हायस्कूलमध्ये शेजारी राहणाऱ्या दादाच्या लग्नासाठी माझे पिताश्री गेले होते. बोर्डवरचे माझे नांव वाचून इतके खूष झाले ते!त्यांच्या चेहऱ्यावरील त्यावेळचा तो आनंद मला जीवनात नवी उमेद देऊन गेला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा