"दो बदन" - आत्मकथन भाग १
फोटो साभार: गूगल
साधारण आठ-नऊ वर्षाची असेन मी त्यावेळी! आमच्या घराजवळच असलेल्या गुरलिंग आंबोळे यांच्या दुकानात एक नवीनच चीज विक्रीसाठी आली होती. कागदी बोर्डवर वेगवेगळ्या आकर्षक रंगात लावलेली ही चीज चमचम चमकत होती. मी दुकानात दुसरा माल घेण्यासाठी गेले होते; पण माझे लक्ष त्या चीजकडेच लागले होते. न राहवून मी त्या काकांना विचारले, "हे हो काय काका नवीनच विकायला आणलयं?" ते म्हणाले, "यांना दो बदन म्हणतात हे वेणीला लावायचे असतात." मी निरखून त्यांच्याकडे पाहिले त्यात खरोखरच दोन मोठे रंगीत चमकणारे मणी दिसत होते. वेणीला फक्त रिबन लावतात हे माहित असलेल्या मला त्या दो बदनचं फारच कौतुक वाटलं, हे वेणीला लावल्यावर कित्ती छान दिसतील वेण्या अशी कल्पना करत दो बदन.... दो बदन असे वारंवार म्हणतच घरी परतले. हे नाव माझ्या दृष्टीने अगदी नवे होते पाठ व्हायला पाहिजे ना!
दुसऱ्या दिवशी दुसरा माल आणण्यासाठी दुकानात गेले. दो बदनकडे पाहिले व काकांना विचारले, "काका, दो बदन केवढ्याला एक मिळते हो?" ते म्हणाले, "तीस पैशाला एक." किंमत ऐकून माझा चेहरा शॉक बसल्यासारखा झाला. तीस पैसे म्हणजे त्यावेळी माझ्या दृष्टीने मोठी रक्कम होती. त्यात मी दोन वेण्या घालायची म्हणजे साठ पैसे हवेत. कोठून आणायचे साठ पैसे? खूप विचार केला. आई-वडिलांकडून ६० पैसे मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. आम्हाला पोटभर अन्न, अंगभर कपडा-लत्ता व शाळेचा खर्च भागवताना त्यांची किती दमछाक होते हे आम्ही पहात होतो, अनुभवत होतो. दो बदन घेण्याची अनिवार इच्छा होती; पण करायचे काय? विचारचक्र सुरूच होते.
त्यावेळी डिसेंबर-जानेवारी महिना सुरू होता. भुईमुगाच्या शेंगाची सुगी संपलेली होती. शेंगाची तोडणी, वेचणी व उकरणीही झाली होती. दिवाळीच्या सुट्टीत आमचे हे काम दिवसभर सुरू होते. शाळेला दांडी मारूनही ही कामे आम्हाला करावीच लागायची. कारण चार पैसे मिळविण्याची संधी या सुगीत मिळायची. सुगी संपली होती. वरील सर्व कामे संपली तरी एक काम बाकी होते. शेंगाच्या वेल जेव्हा जमिनीतून वर काढला जातो त्यावेळी बऱ्याचशा शेंगा जमिनीवर पडतात. वेलाला असणाऱ्या शेंगांची तोडणी झाली की पडलेल्या शेंगांची वेचणी केली जाते. त्यानंतर सुरू होते उकरणी. छोटा दांडा असलेल्या खोऱ्याने जिथून वेल काढला आहे तिथून वेल उपटताना जमिनीत एखादी-दुसरी शेंग मिळाली तर काढून घेण्याचे काम करण्याचे मी ठरविले. माझा हा मनोदय माझ्या मैत्रिणीला सुमनला सांगितला. या रविवारी आपण दोघी अशा शेंगा उकरायला जावू या. शेंगा विकून दो बदन विकत घेऊ या. तिलाही हा बेत आवडला. रविवारी सकाळी लवकर उठून आईने सोपवलेली नित्याची कामे उरकून, बुट्टी, खोरे जेवणाचा डबा घेवून मी व सुमन या दो बदन खरेदी करण्याच्या मोहिमेवर निघालो. एका शेतात शेंगा उकरण्यास सुरूवात केली. मोठ्या मुश्किलीने एक-एक शेंग मिळत होती. एक-दोन शेंगासाठी बुट्टीभर माती ओढावी लागत होती. पण आम्ही प्रयत्न सोडला नव्हता. दो बदन वेणीला लावायचे होते ना!
सूर्य डोक्यावर आला. उन्हाचा चटका जाणवू लागला. पण ६० पैसे मिळतील एवढ्या शेंगा बुट्टीत जमल्या नव्हत्या. दोघीनी बांधावरच्या झाडाखाली बसून डब्यातील भाकरी खाल्ली व पुन्हा शेंगा उकरण्यास सुरूवात केली. हात खूपच दुखू लागले होते. मध्येच हातातील खोरे खाली टाकून तळहात पाहिला तर हात लालेलाल झाला होता. व त्यावर चार फोड उठले होते. ते पाहून मनात म्हटले, "दो बदन घालायचे आहेत म्हटल्यावर एवढा त्रास सोसावाच लागेल." हातात कापड घेऊन खोरे घेतले त्यामुळे तळहात दुखायचा थांबला काहीसा! सूर्य मावळतीकडे झुकला होता. साधारण चार वाजून गेले असावेत. आम्ही दोघी खूप दमलो होतो. घरी जाण्याचा निर्णय घेतला. वाटेतच दुकान होते. शेंगा विकून माल घ्यायची सोय होती. दुकानदाराने शेंगा मापात घालून बघितल्या. माप भरण्यास थोड्या कमी होत्या. त्यामुळे मुलांना त्यांनी पन्नास पैसे होतात असे सांगितले. आम्ही दोघी काकुळतीला येऊन म्हणालो, "पुन्हा कधी तरी थोड्या जास्त शेंगा आणून देऊ आता आम्हाला हे दोन बदन द्या." त्यांनी दोघींनाही दोन-दोन दो बदन दिले. मला आजही आठवतात कष्टाने मिळविलेले ते दो बदन. त्यांचा रंग मेहंदी होता. किती अप्रुप वाटलं ते दो बदन वेणीला घालताना. दुसऱ्या दिवशी वेण्या पुढे घेऊन शाळेतील मैत्रिणींना दाखवताना किती सुखावून गेले मी! हाताला आलेले फोड कांही दिवसांनी बरे झाले पण ते दो बदन मी २-३ वर्षे सणावाराला, कार्यक्रमाला वापरले!
परवा ईदच्या आधी झाडून काढताना माझ्या मुलींचे, सुनेचे, नातीचे बो, क्लिपा, खेकडा, क्लचर, आकडे, बिटस, बांगड्या, हार, कुड्या, डूल, झुबे एकत्र केले तर प्रत्येकीची एक मोठी प्रवासी बॅग भरेल एवढ्या वस्तू होत्या. त्या पाहून मला त्या 'दो बदन' ची आठवण झाली व त्यांना ही हकीकत सांगितली. कष्टातून शिक्षण घेऊन मुलांना सर्व सुखसोयी मिळवून देणाऱ्या माझ्या सर्व वाचक बंधू भगिनींना एक विनंती करते, आपल्या मुलांना अशा कष्टाची, कष्टातून मिळणाऱ्या आनंदाची अनुभूती कशी मिळणार? निदान त्यांना आपण भोगलेल्या कष्टाच्या हकीकती सांगून तरी अशी अनुभूती देण्याचा प्रयत्न करू या...!