मराठी लघुकथा संच क्र. ९
लघुकथा क्रं ४१
झाशीची राणी बघ
एक इतिहासाचे तज्ज्ञ शिक्षक असतात. ते आपल्या वर्गात १८५७ चे युद्ध हा धडा शिकवून आलेले असतात. त्यांच्या शहरातील झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या पुतळ्याचा संदर्भ देत या राणीने युद्धात दामोदर या दत्तकपुत्राला पाठीशी बांधून लढल्याचे रसभरीत वर्णन प्रभावीपणे त्यांनी विद्यार्थ्यांसमोर केले होते. विद्यार्थीही या पाठात तल्लीन झाले होते. त्यामुळे ते खूश होते. घरी आल्यावर ते पेपर वाचत बसले. नोकरीवरून दमून आलेली त्यांची पत्नी स्वयंपाक करत असते. एवढ्यात त्यांचे छोटे बाळ झोपेतून उठले व रडू लागले. बायको म्हणाली," जरा बाळाला घ्या ना " शिक्षक म्हणतात," अगं, राणी लक्ष्मीबाईनी मुलाला पाठीशी बांधून युद्ध केले .तू फक्त स्वयंपाक सुद्धा त्याला पाठीवर घेऊन करू शकत नाहीस ?काय हे!"
लघुकथा क्रं ४२
खऱ्याचं खोटं, लबाडाचं मोठं
अलकाची आई कन्या शाळेत शालेय पोषण आहाराचे तांदूळ न्यायला आली. देसाई मँडम् म्हणाल्या," अलका पंधरा दिवस गैरहजर होती त्यामुळे तिला या महिन्याचे तांदूळ मिळणार नाहीत." त्यानंतर आई कुमार शाळेत शिकणाऱ्या अमोलकडे गेली. कुंभार सरांनी अमोलचे तांदूळ दिले. आई सरांना म्हणाली," तुम्ही तांदूळ दिलासा पण देसाई मँडम् अलकाचे तांदूळ देता येत नाही म्हणाल्या्!" कुंभार सर म्हणाले," अमोल गैरहजर असतानाही मी हजेरी मांडली म्हणून तांदूळ मिळाले तुम्हाला"सरांचे आभार मानून आई मँडम्कडे गेल्या व म्हणाल्या," तुम्ही अलकाची हजेरी का नाही मांडली ? जरा शिका त्या अमोलच्या सरांकडून गरिबांना मदत करायला. ते सर किती चांगले आहेत बिचारे! तुम्ही जरा खऱ्यानं वागायला शिका मँडम् !" मँडम् मनात म्हणाल्या ' खऱ्याचं खोटं, लबाडाचं मोठं '
लघुकथा क्रं ४३
चष्मा धुतला स्वच्छ
रमाकाकूचं वय झालं होतं.त्यांना फारसं बाहेर जाणं होत नव्हतं. त्यामुळे बेडवर बसल्या बसल्या खिडकीतून दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं त्यांचं निरिक्षण चालू असायचं. शेजारी एक नवीन कुटुंब रहायला आलं.त्यामुळे रमाकाकूना निरिक्षण करायला एक नवा विषय मिळाला.त्या कुटूंबातील स्त्री रमाकाकूंच्या खिडकीच्या समोर दररोज कपडे धुवून वाळत घालायच्या.रमाकाकू मनात म्हणायच्या या अजिबात कपडे स्वच्छ धुत नाहीत सारे धुतलेले कपडे मळकटच वाटतात. एके दिवशी रमाकाकू आपल्या पतीना गोपाळरावांना म्हणाल्या," इतके दिवस मी बघते त्यांचे कपडे अस्वच्छच असतात. आज मात्र त्यांनी कपडे स्वच्छ धुतलेले दिसतात." गोपाळराव हसत म्हणाले," त्या दररोजच कपडे स्वच्छ धुतात. तुला मात्र आज स्वच्छ दिसताहेत कारण तू झोपल्यावर मी तुझा चष्मा स्वच्छ धुवून पुसला आहे." रमाकाकू लाजत म्हणाल्या," अस्सं होय "
लघुकथा क्रं ४४
विमानाने सर्वेक्षण
कोरोना लाँकडाऊनच्या काळात कुटुंबाच्या आरोग्य सर्वेक्षणाची जबाबदारी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना दिली होती. प्रत्येक कुटुंबात जाऊन साठ वर्षावरील व्यक्ती किती आहेत. त्यापैकी कुणाला बी.पी. शुगरचा त्रास आहे याची नोंद करायची होती. नोंदीनंतर दररोज त्यांच्या घरी जाऊन कुणाला कांही त्रास आहे का हे विचारुन तसा रिपोर्ट ग्रामसेवकांच्याकडे द्यायचा होता. मोबाईलवरून पहिल्या आठवड्यात काम चोखपणे बजावल्यानंतर व कुणाला विशेष त्रास नसल्याने कामात थोडी शिथिलता आली होती .त्यात पावसाने जोर धरला होता. नद्यांना पूर आला होता. रस्ते बंद झाले होते. जवळच्या शहरात राहणाऱ्या एका मँडमनी ग्रामसेवकांना रिपोर्ट पाठवला.बी.पी.-०, शुगर-० . ग्रामसेवकांनी मँडमना मेसेज पाठवला.' मँडम् पुलावर पाणी आलय.रस्ते बंद आहेत सर्वेक्षण विमानांनी केलं का?बाकीच्या मँडम् सावध झाल्या व मनात म्हणाल्या,' बरं झालं मी रिपोर्ट नाही पाठवला.'
लघुकथा क्रं ४५
साडीऐवजी घर
सुषमाने नवीन साडी घेण्यासाठी पती सुरेशकडे हट्ट केला.सुरेश म्हणाले," किती ढीगभर साड्या आहेत त्यातील एखादी नेस ना,काँलनीतला नवरात्र उत्सव तर आहे.' सुषमा म्हणाली," तशा भरपूर साड्या आहेत हो माझ्याकडे, पण त्या सर्व काँलनीतल्या सर्वाऔनी पाहिलेल्या आहेत.नवीनच आणा ना एखादी !" ठीक आहे म्हणत सुरेश आँफिसला गेले. सुषमा संध्याकाळी सुरेश यांच्या वाटेकडे डोळे लावून बसली, हे नक्की आणणार नवीन साडी म्हणून! संध्याकाळी ते रिकाम्या हाती परतले. सुषमाने विचारले," का नाही आणली साडी? " सुरेश शांतपणे म्हणाले," साडी आणण्याऐवजी दुसऱ्या काँलनीत घर बघून आलोय. एक तारखेला तिकडे शिप्ट होवू या.त्या काँलनीतल्या कुणीच तुझ्या साड्या पाहिलेल्या नाहीत. पुढील एक दोन वर्षे तरी माझा साडी खरेदीचा त्रास वाचेल! होय ना सुषमा!"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा