गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२०

पंडीत जवाहरलाल नेहरु - विशेष लेख

 

पंडीत जवाहरलाल नेहरु

मुला, माणसातील प्रतिभावंत नेते

लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी



फोटो साभार: गूगल


       पंडीत जवाहरलाल नेहरु यांचे अतूट बालप्रेम आणि बालकांचा त्यांच्यावरील अपार विश्वास या सहसंवादी नात्यातून दिनांक १४ नोव्हेंबर १९५२ पासून पंडीत नेहरूजी यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो.


       पंडीत जवाहरलाल नेहरु हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आणि ब्रिटिशांच्या तावडीतून देशाला मुक्त करणाऱ्यांचे अध्वर्यू महात्मा गांधीजींचे एक प्रमुख अनुयायी, आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनाचे आणि समाजवादासारख्या नव्या सामाजिक, राजकीय विचारसरणीचे लोकप्रिय उद्गाते, सोपे व उत्कृष्ट इंग्रजी लिहिणारे ग्रंथकार, साहित्यिक पश्चिमी जगतामध्ये विलक्षण दबदबा असलेले राष्ट्रप्रमुख इत्यादी अनेक उपाधीमुळे हयातभर आणि नंतरही गाजत राहिलेले महापुरुष होते.


       पंडीत नेहरूजींच्या व्यक्तिमत्वातील उदारमतवादी देशभक्तीच्या पदरावर उच्च दर्जाच्या सुसंस्कृतपणाचे आणि अभिजात मानवतेचं जे बहारदार विणकाम केलेले होते, त्याचा अनेक देशातील थोरामोठ्यांना हेवा वाटतो. स्वतंत्र झालेल्या स्वदेशाच्या भवितव्यावर स्थिर नजर ठेवून पंडीत नेहरूजींनी भारतात सुरू केलेले कार्य हा जगातील विचारवंतांच्या कुतूहलाचा आणि अभ्यासाचा विषय होऊन बसला आहे.


पंडीत नेहरूजींचा मुलांबद्दलचा जिव्हाळा:

        एकदा आपला नातू राजीव याच्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्यांनी चार पाचशे मुलांना आपल्या घरी आनंदभवनात बोलावले, त्यांच्या खेळाच्या स्पर्धा लावल्या आणि त्यात स्वतःही भाग घेतला. खेळ सर्वांनी खेळण्याजोगे लपंडाव व शिवाशिवीचे होते. गोष्टी सांगायचे होते. गाणी म्हणायचे होते.


       दिल्लीतील एका शिशु विहाराला त्यांनी कळवून ठेवले होते. मला वेळ मिळाला की मी तुमच्याकडे येईन आणि विद्यार्थ्यांच्या संगतीत वेळ घालवीन.


       जपानमधील मुलांनी हत्ती पाहिला नव्हता. त्यांनी हत्तीची मागणी पंडीतजींच्याकडे केली. त्यांनी लगेच म्हैसूरच्या जंगलातून चेन्नईकडे आणि तेथून बोटीने जपानकडे एका हत्तीणीची विनाविलंब पाठवणी केली. तेथे मुलांची हत्ती पाहण्यासाठी चढाओढ लागल्याचे फोटो जपानी वृत्तपत्रातून झळकले. ही दहा वर्षाची हत्तीणी टोकिओच्या प्राणिसंग्रहालयचे आकर्षण ठरली.


पंडीत नेहरूजींचे वाचनप्रेम:

        थोड्या मोठ्या मुलाशी बोलण्याचा प्रसंग येई तेंव्हा पंडीतजी त्यांना स्वानुभवाचे जे विषय आवर्जून सांगत त्यात बालपणापासूनच मुलांनी वाचनाचे वेड लावून घेण्याच्या गोष्टी प्रथम येत असत. आपल्या लहान बहिणीस म्हणजेच कृष्णा हाथीसिंग यांना नवनवीन पुस्तकाबद्दल ते पत्रे लिहित. आपली कन्या इंदिरा हिने विशिष्ट पुस्तके वाचलीच पाहिजेत याबद्दल ते आग्रही असत. ते स्वतः घाई गर्दीच्या कार्यक्रमातही नित्यनियमाने वाचन करीत. आपले ज्ञानभांडार सतत समृद्ध व संपन्न करण्यांवर त्यांचा भर असे. जणू कांही जीवनातील हीच अग्रक्रमाची इच्छा ते उराशी बाळगून होते.


पंडीत नेहरूजींची शारीरिक, मानसिक तंदुरुस्ती व आत्मपरीक्षण:

        योगव्यायाम आणि प्राणायाम ते रोज न चुकता करीत. स्वतःच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना आपला कोणताही नियोजित कार्यक्रम रद्द करावा अगर बदलावा लागलेला नव्हता. शीर्षासनासारखे अवघड आसन ते सहजपणे करीत. नियमित व्यायामाचे महत्व ते अगदी आत्मविश्वासाने सांगत. त्यांच्या उपदेशाचा आवडता विषय होता आत्मपरीक्षण. आपण घरीदारी कसे वागतो, कसे बोलतो, विचार करण्यात कुठे चुकतो, दुसऱ्याला दुखावतो का सांभाळून घेतो, स्वभावाच्या आणि वृत्तीच्या कोणत्या गुण दोषांचा अधिक विचार करावयास हवा इत्यादी गोष्टींच्या निखळ चिंतनाची सवय त्यांनी स्वतःस लावून घेतली होती.


पंडीत नेहरुजींचा वाढदिवस बालदिन झाला:

       बालदिनाचे उद्गाते म्हणून ज्या मराठी कार्यकर्त्याचा उल्लेख केला जातो ते विनायक मार्तंड कुलकर्णी होत. ते पंडीत नेहरूजी आणि इंदिरा गांधी यांच्या विशेष जवळच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांपैकी होते. त्यांनी पंडीत नेहरूजींचा वाढदिवस हा बालदिन म्हणून साजरा करावा अशी कल्पना मांडली आणि विविध वरिष्ठांकडून तिला मान्यताही मिळविली. सन १९५२ पासून बालदिन  अधिकृतपणे साजरा  होवू लागला.


पंडीत नेहरूजींची अंतिम इच्छा:

        पंडीत नेहरूंनी आपल्या अंतिम इच्छेत म्हटले आहे....

भारतीय जनतेने माझ्यावर एवढे अपरंपार प्रेम केले आहे, एवढा जिव्हाळा दाखविला आहे की, या प्रेमाची परतफेड अल्पांशानेही करणे केवळ अशक्य आहे. खरे म्हणजे प्रेमासारख्या दिव्य भावनेची परतफेड तरी कशी होणार? माझ्या वाट्याला भारताच्या सर्व भागातील, सर्व थरातील जनतेचे जे प्रेम आले, त्यामुळे मी भारावून गेलो आहे.


        मृत्यूनंतर माझ्यासाठी कोणताही धार्मिक विधी केला जाऊ नये. अशा कर्मकांडावर माझा मुळीच विश्वास नाही. माझ्या निधनानंतर माझ्या देहाचे दहनच करावे माझ्या देहाची राख, ज्या भूमीत भारतातील शेतकरी दिवसरात्र राबतो, काबाडकष्ट उपसतो, त्या भूमीत विखरून टाका. माझ्या देहाचे हे अणूरेणूसुद्धा या भारताच्या मातीत मिसळून जाऊ देत आणि मला भारताच्या भूमीशी एकरुप होऊ द्या. या राखेपैकी मूठभर राख भारताच्या प्राचीन परंपरेचे, वर्तमान प्रयत्नांचे व उज्ज्वल भविष्याचे प्रतिक असलेल्या गंगा नदीत विसर्जन करावी. गंगा ही सर्वार्थाने भारताची नदी आहे. माझ्या मनिषांचा व भावभावनांची गंगा ही साक्षीदार आहे तिच्यात विसर्जित केलेली माझी रक्षा म्हणजे भारताच्या सांस्कृतिक परंपरेला माझा अखेरचा प्रणिपात होय. अलाहबादला गंगेत टाकलेली ही रक्षा आपोआपच सागराला मिळेल, जो सागर भारतमातेच्या चरणतळांना स्नान घालतो. मात्र मूठभर रक्षेचं गंगेत विसर्जन केल्यावर जी राख उरेल ती विमानातून उंच आकाशात न्यावी आणि तिथून ती भारतभूमीवर विखरून टाकावी. तिथल्या मातीशी, धुळीशी ती एकजीव व्हावी. भारताच्या भूमीचाच तो एक अंश बनावा हीच माझी अखेरची इच्छा आहे.


       पंडीत नेहरूजींच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्यातील एखादा तरी गुण आपल्या अंगी बाणविण्याचा प्रयत्न करु या. हीच खरी आदरांजली ठरेल...


1 टिप्पणी: