नात्यांची गुंफण
लेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळी
स्नेह व सुखद सहवास हे जीवनातील सर्वात मोठे आध्यात्मिक मूल्य आहे. महासागरात दैवयोगाने जशी दोन ओंडक्यांची गाठभेट होते, तशी जीवनाच्या महासागरातही स्नेह्यांच्या गाठीभेटी जन्मजन्मांतरीच्या संकेतानुसार घडून येतात. जीवनप्रवासात वळणावळणावर त्यांचा स्नेह भरभरून मिळत जातो व एका अनोख्या नात्याची गुंफण तयार होते. त्यातील काही नाती मानलेली असतात, काही रक्तसंबंधामुळे निर्माण झालेली असतात.
रक्तसंबंधाच्या नात्यांमध्ये स्वायत्तता नसते. त्यांच्यासोबत राहावेच लागते म्हणून प्रेम करावेच लागते. अशा नात्यांंमध्ये कित्येकदा नाइलाज असतो. जुलमाचा रामराम असतो. मानलेल्या नात्यात असे नसते. त्यामुळे अशा नात्यांत एक आगळीवेगळी शक्ती असते. ही नाती कळत नकळत, सहजपणे निर्माण होतात व जीवन सुखी, संपन्न, समृद्ध करतात. जीवनातील सर्व समस्यांवर मात करून जीवन सुसह्य करतात.
माझ्या शेजारी राहणारी माझी मैत्रीण रिमा व तिचा मानसपुत्र आकाश यांच्यातील स्नेह पाहून एका अनोख्या नातेसंबंधाचे दर्शन होते. रिमाचा विवाहित मानसपुत्र आकाश कमालीचा हुशार, कर्तृत्ववान, महत्त्वाकांक्षी व समंजस आहे. चार वर्षांपूर्वी काही दिवस तो अस्वस्थ होता, तेव्हा रिमा त्याला म्हणाली, "आकाश आपण मानसोपचार तज्ज्ञांचा या बाबतीत सल्ला घेऊ." हे ऐकून आकाश म्हणाला, "आई, तू मला बरं करू शकतेस, मग विनाकारण त्यांना फी का द्यायची?" आकाशचे हे बोलणे ऐकून रिमाच्या मातृहृदयातील मायेला भरती आली. तिने आपल्या अल्पमतीने त्याला स्नेहाचे चार शब्द सांगितले. मायेचा घास भरविला. त्याला त्याच्या कार्यशक्तीची जाणीव करून दिली. त्याच्यातील हरवलेला आत्मविश्वास जागृत केला.
या मायेच्या वर्षावाने आकाशच्या मनातील अस्वस्थता बाहेर पळून गेली. मूळचाच कर्तबगार असलेला तो जीवनाची वाटचाल यशस्वीपणे करत आहे. आकाशाला गवसणी घालण्याचं बळ त्याच्यात निर्माण झालंय व आईला आकाश ठेंगणं वाटू लागलंय.
२ वर्षापूर्वी माझी मैत्रीण आजारी होती. तिला दवाखान्यात ऍडमिट केले होते. त्या वेळी आकाश कामानिमित्त हजार किलोमीटर दूर होता. त्याला फोनवर जेंव्हा हे समजले, तेंव्हा तो काम अर्ध्यात सोडून परत आला. तोपर्यंत रिमा बरी झाली होती. ती त्याला म्हणाली, "देवाच्या कृपेने मी वाचले, तू तर लांब गेला होतास." त्यावर आकाश म्हणाला, "आई, तुला आजारी पाडून देवाला वर राहायचं नसेल." या वाक्यानं रिमाला केवढं मोठं आत्मिक बळ मिळालं. त्यानंतर तिनं आजारी पडायचं सोडून दिलं. तिच्या जीवनातील ही समाधानाची झुळूक तिला, सुखावून गेली. तिने आपल्या मानसपुत्रासाठी मनोमन प्रार्थना केली. तिची अंतःकरणपूर्वक प्रार्थना सफल झाली.
त्यांच्यातील हे स्नेहपूर्ण नाते पाहून मला रिमाचा हेवा वाटतो. हात शरीराचे, पापण्या डोळ्यांचे ज्याप्रमाणे रक्षण करतात त्याप्रमाणे या नातेसंबंधात एकमेकांची जपणूक होते. जीवनात येणाऱ्या सुखदुःखात सामील होण्यासाठी हे नाते सदैव तयार असते. शेवटी एवढेच म्हणेन,
मायलेकरातील हे ओलावा।
शेकडो वर्षे असाच पहावा।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा